शहरात ठिकठिकाणी साचली पाण्याची तळी
By admin | Published: July 11, 2016 12:16 AM2016-07-11T00:16:00+5:302016-07-11T00:20:43+5:30
शहरात ठिकठिकाणी साचली पाण्याची तळी
नाशिक : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली होती. शहरात सर्वत्र डांबरीकरण आणि कॉँक्रिटीकरणाचा फास आवळत असल्याने सर्वत्र रस्त्यांवर पाणी तुंबल्याचे चित्र बघावयास मिळाले. नाशिकरोडला जयभवानीरोड, आनंदनगर, जेलरोड, चेहेडी पंपिंग, बोधलेनगर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जुने नाशिक, तिडके कॉलनी पुल, सिडकोतील गोविंदनगर, उंटवाडी सिग्नल चौकात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.
शहरातील गोल्फ क्बल सिग्नल चौकात साचलेल्या पाण्यामुळे अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या, तर दुचाकी या पाण्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात बंद पडल्याने वाहनधारकांना दुचाकी लोटत पाण्याचा प्रवाह पार करावा लागला. अशीच काहीशी परिस्थिती तिडके कॉलनी मार्गावर होती. शालिमार चौकातही पाणी साचले, तर मेनरोडवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. नाशिक-पुणे महामार्गावर नेहमीप्रमाणेच पाणी तुंबले होते, तर उपनगर-लोखंडे मळा मार्गाला तर नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. जेलरोड सैलानी चौकातही पाण्याचे तळे झाले होते.