खोपडीच्या पुरातन दत्त मंदिरात पूजा विधी सुरू - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:18 AM2021-09-16T04:18:40+5:302021-09-16T04:18:40+5:30
सिन्नर : तालुक्यातील खोपडी येथील पुरातन दत्त मंदिरात नियमित पूजाविधी सुरू करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक व पुजारी यांच्यातील ...
सिन्नर : तालुक्यातील खोपडी येथील पुरातन दत्त मंदिरात नियमित पूजाविधी सुरू करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक व पुजारी यांच्यातील वाद मिटवण्यासाठी युवा नेते उदय सांगळे यांनी बैठक घेतली. वाद सामोपचाराने मिटविण्याचा निर्णय झाला. तोपर्यंत मंदिरातील नियमित पूजाविधी सुरू करण्याचे ठरले. नियमित पूजाविधी व आरतीसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. दत्तात्रय दराडे, प्रकाश नन्नवरे आदींसह भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते. श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुरातन वास्तुबाबत कोणताही अनुचित वाद नको. सामोपचाराने सर्व वाद मिटू शकतील. त्यामुळे तूर्त सर्वांच्या संमतीने पूजाविधी नियमित होत राहील, असे उदय सांगळे यांनी या वेळी सांगितले. कोरोनाचे नियम पाळून आरती करावी. सरकारच्या आदेशानुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत. केवळ नियमित पूजाविधी पुजाऱ्यांकडून होतील, असे सांगळे यांनी सांगितले. स्थानिक व पुजारी यांच्यात असलेल्या वादामुळे काही दिवसांपासून मंदिर बंद होते. याबाबतचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला. तथापि, मंदिरात देवाची आरती, पूजाविधी बंद पडल्याच्या कारणास्तव भाविकांत नाराजी वाढत होती. किमान आरती, पूजाविधी नियमित व्हावेत, अशी मागणी होत होती. आरती व पूजाविधी सुरू झाल्याने महानुभाव पंथीयांकडून त्याचे स्वागत केले जात आहे.