दुभाजकातील सुशोभिकरणाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:15+5:302021-01-22T04:14:15+5:30
एम. जी. रोडला विक्रेत्यांचे अतिक्रमण नाशिक : शहरातील मेन रोड, एम. जी. रोडवर विविध विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे. कोरोनामुळे ...
एम. जी. रोडला विक्रेत्यांचे अतिक्रमण
नाशिक : शहरातील मेन रोड, एम. जी. रोडवर विविध विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी या परिसरातून महानगरपालिका प्रशासन व पोलिसांनी विक्रेत्यांना हटवले होते. परंतु, आता शिथिलता मिळाल्याने फळ विक्रेत्यांसोबत अन्य विक्रेत्यांनी या भागात अतिक्रमण करून रस्त्यावर दुकाने लावण्यास सुरुवात केली आहे.
रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
नाशिक : पंचवटी परिसरात बहुतांश भागात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांच्या झुंडी सकाळी आणि रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून फिरत असल्याने नागरिकांनाही त्यांची भीती वाटत आहे. विशेषत्वे मॉर्निग वॉकला आलेल्या नागरिकांना कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. अनेकांना तर मार्गदेखील बदलण्याची वेळ येत आहे.
शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव
नाशिक: शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. पावसाळ्यात उद्याने बंद केली जातात. मात्र, पावसाळा पार पडल्यानंतर उद्यानांची दुरूस्ती केली जाते. यंदा मात्र कोरोनामुळे उद्यानांची कामे हाती घेण्यात आली नसल्याने वाढलेल्या गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या
नाशिक : शहरातील पंचवटी भागांत सध्या मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे तसेच श्वानांचा संचार वाढला आहे. विशेष म्हणजे रस्त्याने फिरणाऱ्या या जनावरांमुळे वाहतुकीला आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गायी, गुरांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर दिसून येतात, तर कधी रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या गुरांमुळे वाहतुकीचा खोळंबा होताे.
रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर
कारवाई करण्याची गरज
नाशिक : रस्त्यावर थुंकणाऱ्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती अद्यापही असल्याने कोविडच्या काळात तरी अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे. परंतु, प्रत्यक्षात कारवाई होतांना दिसत नाही. कोरोनाची लस आल्यामुळे नागरिकांमध्ये बेफिकरी वाढली असून, कोणीही नियमांचे पालन करण्याच्या मानसिकतेत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सीबीएस परिसराला पुन्हा वाहनांचा गराडा
नाशिक : सीबीएस परिसरातील रस्त्यावर नागरिकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर वाहने उभी करून ठेवली जातात. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागते. वाहनांच्या पार्किंगमुळे बऱ्याचवेळा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये वादावादीचे प्रकारदेखील घडतात. त्यामुळे या रस्त्यांवरील या अनधिकृत वाहनतळांवर पार्किंगवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.