नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील फरशी पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:19 AM2021-01-04T01:19:13+5:302021-01-04T01:19:39+5:30

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावरील फरशी पुलाची काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सदर फरशी पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी केली आहे.

Poor condition of paved bridge on Nandurshingote-Wavi road | नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील फरशी पुलाची दुरवस्था

नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील फरशी पुलाची दुरवस्था

Next

नांदूरशिंगोटे :  सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावरील फरशी पुलाची काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सदर फरशी पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी केली आहे.
सिन्नर, संगमनेर, अकोला, कोपरगाव व येवला या पाच तालुक्यांंना जोडणारा नांदूरशिंगोटे ते वावी हा महत्त्वाचा रस्ता आहे, तसेच शिर्डी येथे जाण्यासाठी भाविक याच पर्यायी मार्गाचा वापर करतात. गतवर्षीच सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने जवळचा रस्ता असल्याने अवजड वाहनांची वर्दळही अलिकडच्या काळात वाढली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. 
नांदूरशिंगोटे ते वावी, तसेच कणकोरी फाटा ते निऱ्हाळे गावापर्यंत अनेक ठिकाणी नदीवरून फरशी पूल टाकण्यात आले आहेत, परंतु रस्त्यांचे डांबरीकरण करण्याआधी त्यांची उंची वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची संख्या वाढल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्व भागातील मऱ्हळ, निऱ्हाळे-फत्तेपूर, कणकोरी, मानोरी, नांदूरशिंगोटे आदी गावांतून जामनदी वाहत असून, यावर अनेक ठिकाणी फरशी पूल आहेत. 
नदीवरील पावसाचे पाणी वाहत असल्याने पाण्यात वाळू वाहत येऊन फरशी खालील सिंमेट पाईप वाळूने बंद झाले आहे. त्यामुळे पाणी फरशीवरून वाहत आहे. 
त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशी वाहनचालकांना, तसेच ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात परिसरातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, प्रवाशी, महिला वर्गाची चांगलीच तारांबळ उडते. 
गतवर्षी परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जामनदी तब्बल तीन ते चार महिने दुथडी भरून वाहत होती. निऱ्हाळे येथील कामगाराला नदीवरील पाण्याचा अंदाज न आल्याने आपला प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात फरशी पुलाची समस्या निर्माण होते, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नसल्याचा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Web Title: Poor condition of paved bridge on Nandurshingote-Wavi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.