येवला शहरातील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:41 PM2020-09-04T22:41:36+5:302020-09-05T01:02:44+5:30
येवला शहरातील बऱ्याच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पालिका प्रशासनाने तातडीने किमान रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. शहरातील रस्त्यांचा प्रश्न या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिला आहे. याबरोबरच नगरपालिका बांधकाम विभाग, प्रशासन आणि सत्ताधारी यांचीही चर्चा झडते.
येवला : शहरातील बऱ्याच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पालिका प्रशासनाने तातडीने किमान रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. शहरातील रस्त्यांचा प्रश्न या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिला आहे. याबरोबरच नगरपालिका बांधकाम विभाग, प्रशासन आणि सत्ताधारी यांचीही चर्चा झडते.
शहरातील गंगा दरवाजा ते राणा प्रताप पुतळा, आझाद चौक ते जुनी नगरपालिका रोड, वीज मंडळ कार्यालय - थिएटर रोड ते शनिपटांगण, गुलमोहर हॉटेल ते महादेव मंदिर गंगा दरवाजा, शिंपी गल्ली, पटणी गल्ली, देवी खुंट ते कोर्ट, देवी खुंट ते स्टेट बॅँक, स्टेट बॅँक ते अमरधाम या प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील अनेक रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
काँक्रीट रस्त्यांनी काँक्रीट सोडले आहे तर डांबरी रस्त्यांनी डांबर यामुळे बहुत्वांशी रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातही शहरातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी खडी-मुरमाने काही खड्डे झाकल्या गेले मात्र दोन दिवसातच पुन्हा जैसे थे स्थिती झाली.
शहरातील चहूबाजूने वाढलेल्या नववसाहतींतील रस्ते, गटारी यांचा प्रश्न तर वर्षानुवर्षांपासून कायम आहे. थोडासा जरी पाऊस झाला तरी शहरासह कॉलनी परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. पालकमंत्री भुजबळ यांच्यासह नगरपालिका प्रशासनाने रस्तेप्रश्नी तातडीने लक्ष घालण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.