चाऱ्याअभावी जनावरांची कवडीमोलाने विक्र ी
By admin | Published: September 5, 2015 11:42 PM2015-09-05T23:42:00+5:302015-09-05T23:42:28+5:30
शेतकरी चिंताग्रस्त : पाटोद्यात पशुधन धोक्यात
पाटोदा : येवला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांच्या चाऱ्याबरोबर पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने पशुधन धोक्यात येऊन पशुपालक चिंताग्रस्त बनल्याचे वास्तव आहे.
शेतीच्या कामासाठी जनावरेच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, सर्वच जनावरे वैरणाअभावी गुरांच्या बाजारात मातीमोल किमतीमध्ये विक्र ी होत आहे. हिरवा चारा तर सोडाच परंतु वाळलेल्या गवताच्या काड्यादेखील जनावरांना मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. गेल्या दोन वर्षापासून दुष्काळाचे सावट आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. मात्र आजतागायत उघडीप दिल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. बहुतांशी भागात पावसाचा थेंबही नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, पेरलेले धान्य करपले शिवाय चाऱ्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. मात्र हाती काहीच लागत नसल्याने येवला, कोपरगाव, लासलगाव आदि ठिकाणी भरणाऱ्या जनावरांच्या आठवडे बाजारात जनावरे विक्र ीसाठी आणली जात आहेत. साठवून ठेवण्यात आलेला चारादेखील संपल्याने व पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने दुसरा पर्याय राहिला नसल्याचे पशुपालकांनी सांगितले. शासनाने जनावरांसाठी चारा डेपो, चारा छावण्या उभ्या करून जनावरे वाचिवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी तालुक्यातून होत आहे. (वार्ताहर)