जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ४० टक्क्यांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:09 AM2021-03-29T04:09:42+5:302021-03-29T04:09:42+5:30
नाशिक : मागील एका आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये चाचणी करण्यात येणाऱ्या ...
नाशिक : मागील एका आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये चाचणी करण्यात येणाऱ्या प्रत्येकी दोन ते तीन नमुन्यांपैकी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह निघणाऱ्या रुग्णांची टक्केवारी अर्थात पाॅझिटिव्हिटी रेट अवघ्या पंधरा दिवसांमध्ये तब्बल ४० टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागल्यानंतर चाचण्यांची संख्यादेखील प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे. त्यात आरटीपीसीआर चाचण्या करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. गत महिन्यात सुमारे १० ते १५ टक्क्यांपर्यंत असलेला पॉझिटिव्हिटी रेट मार्च महिन्याच्या प्रारंभापासून मोठ्या वेगाने वाढू लागला आहे. पहिल्या आठवड्यात साधारण २० टक्क्यांवर असलेल्या या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये थेट दुपटीने वाढ होऊन हे प्रमाण ४० टक्क्यांवर पोहोचले आहे.
इन्फो
सप्टेंबरमध्ये होते १५ टक्के
गतवर्षी जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याचा उच्चांक सप्टेंबर महिन्यात झाला होता. त्या सप्टेंबर महिन्यात आणि गतवर्षात बाधितसंख्येने एकदाच २ हजारांचा आकडा ओलांडला होता. तेव्हादेखील कोरोना अहवाल बाधित येण्याचे प्रमाण अवघे १५ टक्क्यांवर होते. त्या तुलनेत सध्याचे बाधित प्रमाण अडीच पटींहून अधिक वाढले असल्याने त्यातील तीव्रता वाढली आहे. गतवर्षी सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याचा होता. त्यावेळी ते प्रमाण ३७ टक्क्यांवर पोहोचले होते. मात्र, नाशिकमध्ये तर मार्चच्या महिन्यातच हे प्रमाण चाळीस टक्क्यांवर पोहोचले असल्याने अजून त्यात किती भर पडणार, अशी चिंता जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला वाटू लागली आहे.
इन्फो
मृत्यूसंख्येतील वाढ चिंताजनक
कोरोना रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हिटी दरातील वाढीबरोबरच मृत्यूसंख्येतील वाढही अधिक मोठ्या चिंतेचे कारण ठरू लागली आहे. कोरोना बळींची संख्या सलगपणे वाढणे ही प्रशासनासह नागरिकांच्या दृष्टीने अधिक गंभीर बाब ठरत आहे. कोरोनाबळी दहा ते वीसवर राहण्याचे प्रमाण कोरोनाच्या बहराच्या काळात म्हणजे गतवर्षी सप्टेंबरमध्येच होते. मात्र, आता जिल्ह्यात अवघ्या दोन दिवसांत बळींची संख्या १५ वरून शनिवारी थेट २५ वर पोहोचली आहे. त्यात अजून भर पडणे ही अत्यंत धोकादायक वाटचाल ठरू लागली आहे.