लॉकडाऊनमध्ये पॉझिटिव्हिटी रेट अवघा १०.४४ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:16 AM2021-05-25T04:16:51+5:302021-05-25T04:16:51+5:30
जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी दि. १२ ते २३ असा बारा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या कालावधीत ...
जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी दि. १२ ते २३ असा बारा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या कालावधीत मेडिकल्सची दुकाने, ऑक्सिजन प्लॅन्ट, वैद्यकीय सेवेशी संबंधित व्यवसाय तसेच रुग्णालये वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. दि. १६ ते २२ मे या कालावधीत १८४० रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४४१ इतकी होती. मे महिन्याच्या सुरुवातीलाच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार हजाराच्या घरात असताना त्यामध्ये हळूहळू घट होण्यास सुरुवात झाली आणि याच काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
मे महिन्याच्या प्रारंभी नाशिक जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट हा तब्बल २३.७१ टक्के इतका होता. रुग्णसंख्या वाढल्यामुळे बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर याचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकची परिस्थिती गंभीर बनल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झाला. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील बावीस दिवसात पॉझिटिव्हिटी रेट २३.७१ टक्क्यांवरून १०.४४ टक्क्यांवर आला आहे. याचाच अर्थ १३.२७ टक्क्यांनी कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण घटले आहे.
--इन्फो--
१६ ते २२ मे या कालावधीत कोरोनाची स्थिती...
कोरोना चाचणी - १४१०९
पाॅझिटिव्ह रुग्ण - १४४१
मृत्यू - ३८
डिस्चार्ज - १८४०
ॲक्टिव्ह रुग्ण - १७ हजार ६०५
पाॅझिटिव्हिटी रेट - १०.४४