समृद्धी महामार्गासाठी नऊ गावांतील २० गटांचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:40 PM2020-06-12T22:40:34+5:302020-06-13T00:09:21+5:30
सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या टप्पा क्रमांक १२ व १३ मधील वीस जागांचा प्रत्यक्षात ताबा घेण्यात आला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात दोन दिवस ही मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, सोनांबे येथे ताबा मिळवताना अडथळा आणणाऱ्या एकावर पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या टप्पा क्रमांक १२ व १३ मधील वीस जागांचा प्रत्यक्षात ताबा घेण्यात आला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात दोन दिवस ही मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, सोनांबे येथे ताबा मिळवताना अडथळा आणणाऱ्या एकावर पथकाने गुन्हा दाखल केला आहे. समृद्धी महामार्गाचे तालुक्यात वेगाने काम सुरू आहे. जमिनीचा ताबा देण्यासाठी मालकांमधील वैयक्तिक हेवेदावे, प्रत्यक्ष कब्जासाठीचे अडथळे, मोबदला घेऊनही ताबा न देणे, जमीन देण्यास विरोध आदी समस्यांमुळे नऊ गावांतील २० गटांवर प्रत्यक्ष ताबा घेता आला नव्हता.
यातील काही गट क्रमांक महामार्गाच्या मध्यभागी होते. त्यामुळे काम करण्यास अडचण निर्माण झाली होती. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ताबा घेण्याचे आदेश काढले होते. त्यानंतर बुधवारपासून दोन दिवस कार्यवाही करण्यात आली.
------------------------------
सोनांबेत विरोध करणाºयावर गुन्हा
सोनांबे येथे गट क्रमांक ७३७चा ताबा घेण्यास गेलेल्या नायब तहसीलदार नितीन गरजे यांच्या पथकाला विरोध करण्यात आला. योगेश ठोंबरे यांनी ताबा देणार नसल्याचे पथकाला सांगितले. ताबा घेण्यापासून परावृत्त केल्यामुळे तलाठी लक्ष्मण हरणे यांनी ठोंबरे यांच्याविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या उपस्थित गटातील घर जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करून प्रत्यक्ष ताबा घेण्यात आला. या गटावर ७५ जणांची नावे आहेत.
---------------------
१ महामार्गाच्या टप्पा क्रमांक बारामध्ये दुसंगवाडी, मºहळ खुर्द, खंबाळे व टप्पा क्र. १३ मध्ये सोनांबे, शिवडे, बेलू येथे जमिनीचा ताबा घेण्याची कार्यवाही करण्यात आली. गुरुवारी टप्पा क्र. १२
मधील दातली, पाटोळे, जयप्रकाश नगर येथे कार्यवाही केली.
२ नायब तहसीलदार, दोन मंडल अधिकारी, दोन तलाठी व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील एका जणाचा प्रत्येक पथकात समावेश होता. पथकांसोबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तीन गटांत घरे असल्याने जेसीबीच्या साहाय्याने ती पाडण्यात आली.