बंद पडलेल्या कारखान्याचे भुखंड धनदांडग्यांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 07:00 PM2018-10-08T19:00:26+5:302018-10-08T19:03:20+5:30
नाशिकला मोठे उद्योग यावेत म्हणून औद्योगिक संघटनांकडून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. मात्र ही मागणी करताना येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना लागणा-या जागेचे काय? असा प्रश्न आहेच. औद्योगिक क्षेत्रात जागाच शिल्लक नसल्याने
नाशिक : सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या मोठ्या कारखान्यांची जागा बिल्डर्स लॉबीने घेऊन ठेवलेल्याने अशा जागा विनावापर पडून असून, अशा जागा औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घेऊन त्या मोठ्या, लघु उद्योगांना उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बंद कारखान्यांची जागा ताब्यात घेण्यास कायदेशीर अडचणी येत असल्याने प्रस्तावित औद्योगिक धोरणात तसा कायदा करण्याचा पर्यायही सुचविण्यात आला आहे.
नाशिकला मोठे उद्योग यावेत म्हणून औद्योगिक संघटनांकडून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. मात्र ही मागणी करताना येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना लागणाºया जागेचे काय? असा प्रश्न आहेच. औद्योगिक क्षेत्रात जागाच शिल्लक नसल्याने उद्योग येऊ घातले तरी त्यांना जागा कशी उपलब्ध करून द्यावी, हा प्रश्न भेडसावित आहे. औद्योगिक विकास महामंडळाकडून उद्योग उभारणीसाठी भूखंड घेताना तीन वर्षांत त्यावर उद्योग उभारून प्रत्यक्ष उत्पादन सुरू करणे आवश्यक आहे असा नियम आहे. परंतु अनेकांनी उद्योग सुरू करण्याच्या नावाखाली भूखंड घेऊन ठेवत गुंतवणूक करून ठेवली आहे. मागील काही महिन्यांपासून एमआयडीसीने कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केल्याने ज्यांनी उद्योग सुरू केलेले नाहीत त्यांच्या ताब्यातील भूखंड परत घेण्यास सुरुवात केली आहे.
बॅँकांचे थकलेले कर्ज, भागीदारीतील वाद, चुकीचे व्यवस्थापन, कामगार कलह, उत्पादनाच्या मागणीत घट, जुने तंत्रज्ञान, कौटुंबिक वादविवाद यासह अनेक बाबींमुळे सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक लहान, मोठे उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी बंद पडलेले आहेत. यातील काही कारखान्यांची जागा बिल्डर्स किंवा धनदांडग्यांनी घेऊन त्यात पैसे गुंतवून ठेवले आहेत. वास्तविक पाहता जागा घेऊन त्यावर उद्योग उभारणे आवश्यक होते. त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळू शकला असता. आता धनदांडग्यांनी जागा घेऊन ठेवल्याने हे भूखंड अनुत्पादक झालेले आहेत. त्यामुळे ज्यांना खरोखर उद्योगासाठी जागेची गरज आहे. त्यांना जागा मिळत नाही. परिणामी असंख्य लघु उद्योजक भाडेतत्त्वावर गाळा घेऊन वर्षानुवर्षे उद्योग व्यवसाय करीत आहेत. त्यांनाही उद्योग विस्तारासाठी अतिरिक्त जागेची गरज निर्माण झाली आहे.