आजारी बिबट्याला घेतले ताब्यात
By admin | Published: July 1, 2017 12:45 AM2017-07-01T00:45:15+5:302017-07-01T00:45:55+5:30
सिन्नर/ नांदूरशिंगोटे : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात आजारी अवस्थेतील बिबट्याला रेस्कू टीमने भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्यानंतर पिंजऱ्यात जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर/ नांदूरशिंगोटे : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात आजारी अवस्थेतील बिबट्याला रेस्कू टीमने भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्यानंतर पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्यावर उपचार केल्यानंतर त्याची रवानगी मोहदरी वन उद्यानात करण्यात आली आहे.
सिन्नर तालुक्यातील डुबेरेवाडी शिवारात रामभाऊ अंबू सदगीर यांच्या शेताजवळ बिबट्या एका जागी बसल्याचे सदगीर यांनी पाहिले. दुपारी २ वाजेच्या सुमारास लक्ष्मण सदगीर भाताच्या शेतात खत टाकीत असताना त्यांना शेजारील पडीक जमिनीत बिबट्या बसल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांच्यासोबत संपर्क साधून डुबेरेवाडी शिवारात बिबट्या बसला असल्याची माहिती देण्यात आली. बोडके यांच्या नेतृत्त्वाखाली तासभरात रेस्कू टीम डुबेरेवाडी शिवारात पोहोचली. वनपाल बी. ए. सरोदे, ए. के. लोंढे, वनरक्षक पी. जी. बिन्नर, के. डी. सदगीर, पी. एस. साळुंके, बाबूराव सदगीर यांनी बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बिबट्याला इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर बेशुद्ध झालेल्या बिबट्याला पिंजऱ्यातून सिन्नरला आणण्यात आले.
बिबट्या आजारी असल्याने रेस्कू टीमला त्यास सहज ताब्यात घेता आले. त्याची रवानगी मोहदरी वनउद्यानात करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीत बिबट्याला ठेवण्यात येणार आहे. दोन वर्षे वयाचा बिबट्या उपाशी असल्याने आजारी पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.