उघड्या डिपींमुळे दुर्घटनेची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:48 AM2019-04-09T00:48:03+5:302019-04-09T00:48:20+5:30
परिसरात महावितरण कंपनीच्या उघड्या डीपीमुळे दुर्घटना होण्याची भीती नाकारता येत नाही परिसरातील उघड्या डिपी तातडीने बंदिस्त करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
इंदिरानगर : परिसरात महावितरण कंपनीच्या उघड्या डीपीमुळे दुर्घटना होण्याची भीती नाकारता येत नाही परिसरातील उघड्या डिपी तातडीने बंदिस्त करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
महावितरण कंपनीच्या वतीने परिसरातील अपार्टमेंट, सोसायटी व कॉलनीतील शेकडोंच्या संख्येने असणाऱ्या वीज ग्राहकांसाठी विविध ठिकाणी वीजजोडणी करता जमिनीवर लोखंडी पत्र्याची डिपी उभारण्यात आले आहेत. त्यामधूनच नागरिकांना वीज जोडणी देण्यात येते. परंतु बहुतेक डिपीच्या दोन्ही बाजूला असलेले पत्राचे झाकण भुरट्या चोरांनी चोरून नेले आहेत.
यामध्ये कमोदनगर, सिद्धिविनायक कॉलनी, पुष्प उद्यानसमोर, वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत जमुना विहार रो-हाउस, श्रद्धाविहार कॉलनी, सार्थकनगर, कलानगर, राजीवनगर यांसह परिसरातील मुख्य अंतर्गत रस्त्यावर असलेल्या महावितरणच्या डिपीचे दोन्ही बाजूचे झाकण अनेक ठिकाणी भुरट्या चोरांनी चोरून नेले आहेत.
दृर्घटनेची भीती
इंदिरानगर परिसरातील उद्यानांमध्ये लहान बालके खेळत असताना डिपीला स्पर्श होवून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या डिपीवर वाहन आदळून दुर्घटना झाल्यावरच वीज कंपनीला जाग येणार का? असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.