प्रस्तावावर घमासान होण्याची शक्यता
By admin | Published: June 29, 2015 01:22 AM2015-06-29T01:22:31+5:302015-06-29T01:23:17+5:30
प्रस्तावावर घमासान होण्याची शक्यता
नाशिक : सिंहस्थात गोदाघाटासह भाविक मार्गांच्या दैनंदिन साफसफाईचा ठेका ३५ ते ३९ टक्के जादा दराने देण्याचा प्रस्ताव आणि त्यासाठी मनपाच्या मुख्यालयात रात्रीचा भरलेला दरबार यावरून सोमवारी (दि. २९) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांकडून प्रशासनाला जाब विचारला जाण्याची शक्यता असून, स्वच्छतेचा ठेका, तसेच घंटागाडीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर घमासान होण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्याच्या पर्वकाळास अवघा दीड महिना उरला असून, महापालिकेने गोदाघाट परिसर आणि भाविक मार्गांवरील दैनंदिन साफसफाईसाठी सुमारे पावणे पाच कोटी रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून स्वच्छतेची कामे करून घेण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतल्यानंतर आणि त्यासंदर्भात चार वेळा निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर तब्बल साडेतीन महिन्यांनी प्रस्ताव तयार झाला आहे. मात्र, या साऱ्या प्रकरणात रिंग झाल्याचा संशय विरोधकांकडून व्यक्त होत असल्याने स्वच्छतेचा ठेका वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. साफसफाईसाठी आउटसोर्सिंगला अगोदरच मेघवाळ समाजाने आक्षेप नोंदविलेला असून, प्रकरण न्यायालयात आहे. त्यासंबंधी येत्या ३० जून रोजी सुनावणीही होणार आहे. त्यातच मागील आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीच्या आदल्या रात्री महापालिकेत संबंधित ठेकेदारांसमवेत भरलेला दरबार उघडकीस आल्याने संशयाचे धुके गडद झालेले आहेत. महापालिका आयुक्तांनी स्वच्छता व आरोग्यविषयक प्रश्न असल्याने संबंधित ठेक्याची तातडी मागील सभेत बोलून दाखविली होती. रात्री उशिरा थांबून स्वच्छता, घंटागाडी आणि अग्निशामक दलाच्या रेस्क्यू व्हॅनसंबंधीच्या प्रस्तावाला अंतिम रूप दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. उपलब्ध वेळ आणि कामांची तातडी लक्षात घेता यापूर्वी स्थायीच्या बैठकींकडे पाठ फिरविणाऱ्या आयुक्तांनीही मागील सभेत हजेरी लावत आश्चर्याचा धक्का दिला होता. सदरचे प्रस्ताव जादा विषयात घुसविण्याचा प्रयत्न लक्षात येताच प्रा. कुणाल वाघ, राहुल दिवे व रंजना भानसी यांनी सभापतींना पत्र देत जादा विषयांना हरकत घेतली होती व त्यासाठी स्वतंत्र सभा बोलाविण्याची सूचना केली होती. त्यामुळे सदरच्या प्रस्तावांची मान्यता लांबली. त्यानुसार शॉर्ट नोटीसवर सोमवारी (दि.२९) संबंधित प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी स्थायीची बैठक बोलाविण्यात आली आहे. बैठकीत स्वच्छतेच्या ठेक्यात जादा दराच्या निविदाप्रकरणी होणाऱ्या आरोपांवर विरोधकांकडून प्रशासनाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. या ठेक्यात सत्ताधारी मनसेशी संबंधित ठेकेदार सहभागी असल्याने मनसेच्याही भूमिकेकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)