लिनिअर अलजेब्रा पेपर पुन्हा होण्याची शक्यता पुणे विद्यापीठ : परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे चौकशीत स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:53 AM2018-05-09T00:53:02+5:302018-05-09T00:53:02+5:30
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून एसवायबीएस्सीचा लिनिअर अलजेब्रा विषयाची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या दोघांना नाशिकमध्ये अटक झाल्यानंतर चौकशी समितीने अहवाल विद्यापीठाकडे सुपूर्द केला आहे.
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून एसवायबीएस्सीचा लिनिअर अलजेब्रा विषयाची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या दोघांना नाशिकमध्ये अटक झाल्यानंतर चौकशी समितीने अहवाल विद्यापीठाकडे सुपूर्द केला आहे. तत्पूर्वी समितीने केलेल्या चौकशीत लिनिअर अलजेब्राची प्रश्नपत्रिका पेपर होण्यापूर्वीच फुटल्याचे स्पष्ट झाल्याने या विषयाचा पेपर पुन्हा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चौकशी समितीचा अहवाल व सायबर क्राइमच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या आधारे ही प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी कुलगुरु व प्रशासन काय निर्णय घेणार याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. पुणे विद्यापीठाच्या विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्र माची परीक्षा सुरू असताना, दि. २८ एप्रिल रोजी द्वितीय वर्षाच्या लिनिअर अलजेब्राची परीक्षा होती; परंतु २७ एप्रिलच्या मध्यरात्रीच या विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विद्यापीठाने केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, हिरे महाविद्यालयाचे प्रा. ए. व्ही. पाटील, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. राजेश तलवारे यांच्या त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी केली. या चौैकशीतून क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांपर्यंत धागेदोरे पोहोचले आणि विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून पेपर फोडल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सायबर क्राइमच्या पोलिसांनी केलेली कारवाई व चौकशी समितीच्या अहवालनुसार प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे उघड झाले असून, विद्यार्थ्यांना या विषयाची परीक्षा पुन्हा द्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, पेपरफुटीचे प्रकरण उघड करणाºया आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या परीक्षेतील आणखी काही प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा केला असून, संपूर्ण परीक्षाच पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.
शनिवारी निर्णय अपेक्षित
लिनिअर अलजेब्रा प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने आठ दिवसांत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून विद्यापीठाकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालात केलेल्या सूचना अथवा शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी पुणे विद्यापीठात शनिवारी (दि. १२) परीक्षा मंडळाची बैठक होणार असून, या बैठकीतच या प्रकरणाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.