पाऊस लांबल्याने टॅँकर वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:43 PM2019-07-05T23:43:01+5:302019-07-06T00:16:18+5:30
जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अनेक तालुक्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अजूनही ग्रामीण भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने त्याचा आढावा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी शुक्रवारी घेतला.
नाशिक : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अनेक तालुक्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अजूनही ग्रामीण भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने त्याचा आढावा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी शुक्रवारी घेतला. जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे काही तालुक्यांमध्ये १४ टँकर लागण्याची शक्यता असल्याने टँकर वाढणार असतील तर तालुक्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सांगळे यांनी दिले.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेताना पाणीटंचाईबाबत राबविण्यात येत असलेल्या उपयायोजनांची माहिती घेऊन प्रत्येक गावाला पाणीपुरवठा होईल यासाठी जबाबदारीने काम करण्याचे तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईबाबत दिलासा देण्यासाठी विशेष उपायोजना करण्याचे निर्देश शीतल सांगळे यांनी यावेळी दिले. यावेळी पर्जन्यमानाबाबत माहिती घेऊन विंधन विहिरींचाही आढावा घेण्यात आला. याबाबत या बैठकीत तालुकानिहाय आढावा घेण्यात आला आहे.
टँकर वाढत असतील तर तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. बैठकीस ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, सर्व तालुक्यांमधील गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांचे उप अभियंता आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात जूनपर्यंत ३९७ टँकर सुरू होते, मात्र ५ जुलैपर्यंत यातील ९७ टँकर कमी झाले आहेत. मात्र तरीदेखील सिन्नर, बागलाण, नांदगाव, येवला, मालेगाव व देवळा तालुक्यात अतिशय कमी पाऊस झाल्याने या तालुक्यांमध्ये आढाव्यानुसार १४ टँकर लागण्याची शक्यता असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.