संमेलनासाठी आता दिवाळीनंतरचा वायदा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:16 AM2021-07-30T04:16:05+5:302021-07-30T04:16:05+5:30
नाशिक : प्रस्तावित साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या ४० समित्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत संमेलन आयोजनाबाबत दिवाळीनंतरच्या तारखेसाठी तयारी दाखविण्याचा निर्णय ...
नाशिक : प्रस्तावित साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या ४० समित्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत संमेलन आयोजनाबाबत दिवाळीनंतरच्या तारखेसाठी तयारी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोरोना गेल्यानंतर तसेच दिवाळीनंतर संमेलन आयोजित करण्यास नाशिकचे पदाधिकारी इच्छुक असल्याचा निरोप साहित्य महामंडळाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय देण्याबाबत तसे पत्र नाशिकच्या निमंत्रकांना पाठविले होते. मात्र,कोरोनाची स्थिती आणि तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याबाबत विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही मत या बैठकीत मांडण्यात आले. तसेच विविध समित्यांच्या प्रमुखांनी त्यांच्या समितीच्या कामकाजाबाबतचा आढावादेखील सादर केला. तारीख निश्चित झाल्यास त्यानंतरच्या पंधरा दिवसात सर्व यंत्रणा सज्ज असेल असा विश्वासदेखील या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच संमेलनाचे आयोजन हे ऑनलाईन नकोच तर ऑफलाईनच व्हावे, याबाबतही यावेळी आग्रही भूमिका मांडण्यात आली. यावेळी प्रस्तावित साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, नाशिककडून मिळणाऱ्या उत्तरावर संमेलन पुढे अजून काही काळ स्थगित करायचे की नाशिकचे संमेलन रद्दच करायचे, त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या आयोजकांकडून येणाऱ्या उत्तरावर संमेलनाबाबतचा पुढील निर्णय ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयावर साहित्य महामंडळ आणि त्याचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.