नाशिककरांना दिले ‘पोस्ट कोविड’ योगाचे धडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:12 AM2021-05-17T04:12:37+5:302021-05-17T04:12:37+5:30
नाशिक : कोरोना आजारावर मात केल्यानंतरही बराच काळ रुग्णांना थकवा तसेच इतर व्याधींचा सामना करावा लागतो. मात्र नियमित योग ...
नाशिक : कोरोना आजारावर मात केल्यानंतरही बराच काळ रुग्णांना थकवा तसेच इतर व्याधींचा सामना करावा लागतो. मात्र नियमित योग केल्यास, या व्याधींना दूर करणे सहज शक्य होऊ शकते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त धम्मगिरी योग महाविद्यालयाने ‘पोस्ट कोविड’ योगाचे धडे देण्यासाठी मोफत योग शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये योगासने, प्राणायामाची प्रात्याक्षिके दाखविण्यात आली.
५ ते १५ मेदरम्यान ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हे शिबिर आयोजित केले होते. सकाळी ६.३० ते ७.३० वाजेदरम्यान, कोरोनामुक्तीनंतरचे योगाचे धडे शिबिरात देण्यात आले. उज्जयनी प्राणायाम, शीतकारी, शीतली, चंद्रभेदन, सूर्यभेदन, भ्रामरी प्राणायाम, सूर्यनमस्कार, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, तसेच हृदयाची कार्यक्षमता सुरळीत ठेवण्यासाठी श्वसनाचे वेगवेगळे प्रकार, जलनेती आदींबाबतचे धडे देण्यात आले. या शिबिरात तब्बल तीनशेपेक्षा अधिक नाशिककरांनी सहभाग नोंदविला. डॉ. विशाल जाधव, राजेंद्र काळे, सीमा पाठक, स्मिता खैरनार, रंजना पाटील, डॉ. बाळासाहेब घुले, डॉ. सतीश वाघमारे, प्रा. राजेंद्र काळे, प्रा. शिवाजी खोपे आदींनी उपस्थितांना योगाचे धडे दिले.
-----------
कोट
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराचा त्रास उद्भवत आहे. मात्र नियमित पोस्ट कोविड योग केल्यास या आजाराला दूर सारता येऊ शकते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जलनेती केल्यास, म्युकरमायकोसिसचा धोका बऱ्यापैकी टाळता येतो. त्यामुळे नागरिकांनी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यास प्राधान्य द्यायला हवे.
डॉ. विशाल जाधव, योग साधक