टपाल कार्यालयाच्या स्थलांतराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2016 11:02 PM2016-06-23T23:02:40+5:302016-06-23T23:19:31+5:30
अशोकनगर : नागरिक त्रस्त, कॉलनीतील भूखंड मात्र पडून
सातपूर : अशोकनगर येथील भाड्याच्या घरातील टपाल कार्यालय परिसरातील नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. त्यातच जागा मालकाने ही जागा रिक्त करून मागितली आहे. त्यामुळे टपाल कार्यालयाचे स्थलांतर होणार आहे. सातपूर कॉलनीत अगोदरच टपाल खात्यासाठी राखीव भूखंड असून, त्यावरच आता अद्ययावत इमारत उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना उभे राहायलादेखील जागा नाही. या कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने येत असल्याने त्यांची कुचंबणा होत आहे.
टपाल कार्यालयासाठी आरक्षित भूखंडावर अद्ययावत इमारत उभारून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. राज्य कर्मचारी वसाहतीने टपाल कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर घर दिले आहे. ही जागा रिकामी करून देण्याची नोटीस बजावली आहे. तरीही टपाल कार्यालयाने घर खाली करण्याऐवजी भाडे वाढवून देण्याची तयारी केली आहे.
याबाबत खासदार हेमंत गोडसे यांचे लक्ष वेधण्यात आले होते. खासदार गोडसे यांनीही हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप हे आश्वासन पूर्णत्वास आलेले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)