नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकला, बैठकीत मागणी
By दिनेश पाठक | Published: May 10, 2024 04:45 PM2024-05-10T16:45:27+5:302024-05-10T16:46:07+5:30
सुटीच्या काळात मतदान आणि मतमोजणी असल्याने लोकसभा निवडणूक ड्यूटीमुळे उमेदवारी अर्ज कसे व कधी भरायचे? आणि प्रचार कसा करायचा, याबाबत शिक्षक उमेदवार आणि मतदारांमध्ये गाेंधळ निर्माण झाला असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली.
नाशिक : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घाईघाईत ठरविण्यात आला आहे. निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी विविधपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली. सुटीच्या काळात मतदान आणि मतमोजणी असल्याने लोकसभा निवडणूक ड्यूटीमुळे उमेदवारी अर्ज कसे व कधी भरायचे? आणि प्रचार कसा करायचा, याबाबत शिक्षक उमेदवार आणि मतदारांमध्ये गाेंधळ निर्माण झाला असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली.
शुक्रवारी (दि.१०) दुपारी दीड वाजता निवडणूक उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीस उद्धव सेनेचे नीलेश साळुंखे, सुनील जाधव, राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकुमार जे., प्रभाकर पाटील, डॉ.रवींद्र आहेर याशिवाय आम आदमी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेतच शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था पसरली आहे. इच्छुक शिक्षक उमेदवारी करण्यासाठी तयार असले, तरी लोकसभा निवडणूक कार्यक्रम डोकेदुखी ठरत आहे. अनेक शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज कधी भरायचे आणि प्रचार कधी करायचा, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २२ मेपर्यंत असून, २० मेस लोकसभेचा रणसंग्राम (मतदान) आहे. या निवडणुकीत शिक्षकांनी उमेदवारी अर्ज कसे दाखल करायचे? असा प्रश्न शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम १५ मे पासून सुरू होत असून १० जून रोजी मतदान तर १३ जूनला मतमोजणी आहे. तर नाशिक व जिल्ह्यातील दिंडोरी लाकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होत आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रियेतच शिक्षक मतदारसंघाची धामधूम असेल. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. आपल्या भावना निवडणूक आयोगाला कळविल्या जातील, अशी भूमिका निवडणूक उपजिल्हाधिकारी मंगरूळे यांनी मांडली.
बैठकीस थंड प्रतिसाद
सर्वच राजकीय पक्षातील इच्छूक उमेदवार व त्या-त्या पक्षांच्या शिक्षक आघाड्यांमधील प्रतिनिधींना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते, मात्र उद्धव सेनेचे दोन, आम आदमी पक्षाचे एक, कॉंग्रेसचे एक असे माेजकेच इच्छूुक उमेदवार या बैठकीस उपस्थित होते. शिंदे सेना, राष्ट्रवादीचे दोघे गट व अन्य पक्षाच्या इच्छूकांनी बैठकीकडे पाठ फिरविली.