भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी रूपांतरणावरील स्थगिती मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:35 AM2021-02-05T05:35:58+5:302021-02-05T05:35:58+5:30
भोगवटादार वर्ग - २ या जमिनी सामान्यपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनी म्हणून ओळखल्या जातात. या महसुली जमिनीच्या रूपांतरणासाठी अथवा स्वरूपातील बदलासाठी ...
भोगवटादार वर्ग - २ या जमिनी सामान्यपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनी म्हणून ओळखल्या जातात. या महसुली जमिनीच्या रूपांतरणासाठी अथवा स्वरूपातील बदलासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक असते. या जमिनीच्या रूपांतरावर १० डिसेंबर २०२० रोजीच्या आदेशानुसार स्थगिती आणली गेली होती. भोगवटादार वर्ग - २ अर्थात शासकीय जमिनींचे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते आर. पी. कुंवर यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिले होते. त्याबाबत ८ मार्च २०१९ रोजी शासनाने अधिसूचनाही काढली होती; मात्र या अधिसूचनेला १० डिसेंबर २०२० च्या आदेशान्वये शासनाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर कुंवर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्थगिती उठविण्याची मागणी केली होती. मु्ख्यमंत्री ठाकरे यांनी भोगवटादार वर्ग - २ जमिनींचे वर्ग - १ जमिनींमध्ये रूपांतर करण्यावरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महसूल विभागाने दि. २८ जानेवारी रोजी आदेश काढले असून, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पाठविण्यात आले आहेत.
कोट...
स्थगिती आदेश उठविल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. वर्षानुवर्षे रेंगाळलेले शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील. तसेच या निर्णयामुळे शासनदरबारी महसुलात मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे.
- आर. पी. कुवर, सामाजिक कार्यकर्ते