संमेलन पुढे ढकलल्याने रसिकांच्या उत्साहावर विरजण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 12:37 AM2021-03-08T00:37:47+5:302021-03-08T00:37:54+5:30
उत्सव सारस्वतांचा; आयोजनाचे धाडस अंगाशी येऊ नये म्हणूनच निर्णय
धनंजय रिसोडकर
नाशिक : कोरोना काहीसा कमी होण्याच्या मार्गावर असताना, संमेलनासाठीचा प्रस्ताव देणारे नाशिककर धाडसी आहेत, अशी भलावण करीत साहित्य महामंडळाकडून साहित्य संमेलन आयोजनाचा काटेरी मुकुट नाशिककरांकडे सोपविण्यात आला होता. मुळात कोरोनाची बेभरवसा स्थिती आणि त्यात आयोजनासाठी अवघा तीन महिन्यांचा अत्यल्प कालावधी अशी परिस्थिती होती. मात्र, तशातही बरीचशी तयारी पूर्णत्वाकडे जात असतानाच, पुन्हा कोरोना वाढू लागल्याने अखेर संमेलनाचे धाडस अंगाशी येऊ नये, म्हणून ते पुढे ढकलण्याशिवाय पर्याय आयोजकांपुढे नव्हता.
कोरोनामुळे संमेलन होणारच नाही, अशीच स्थिती असताना, डिसेंबरमध्ये कोरोनाचे थैमान कमी होऊ लागल्याने साहित्य महामंडळालादेखील उत्साह संचारला. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातच संमेलन घेऊन राज्य शासनाचे ५० लाखांचे दान पदरात पाडून घेण्यासाठी संमेलन आयोजनाबाबत तत्परतेने निर्णय घेण्यात आले. ते पदरात पडलेदेखील. स्थानिक अठरा आमदार, खासदारांकडूनही एक कोटीचा निधी पदरात पाडून घेतला. नाशिक महापालिका, जिल्हा परिषदेकडून तसेच इतर मार्गांनी ४ कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यात आला होता.
निर्णय नाइलाजानेच...
सारे काही जुळून येण्याच्या मार्गावर असतानाच, पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. संमेलनाचे स्वागताध्यक्षच कोराेनाबाधित झाले आणि रसिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. त्यातच आठवडाभरापासून कोरोना वाढीचा नाशिकमधील वेगही तिपटीहून अधिक वाढला. साहित्यिक, प्रकाशक, माध्यमे, शासन, प्रशासनाकडूनही सातत्याने विचारणा होऊ लागली होती.