कडवा पाणीयोजना हस्तांतरणासह देयके अदा करण्यास स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:20+5:302021-07-02T04:11:20+5:30
सिन्नर : कडवा धरणातून सिन्नर शहरास राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना ठेकेदाराकडून नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. ...
सिन्नर : कडवा धरणातून सिन्नर शहरास राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना ठेकेदाराकडून नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. या योजनेच्या कामाचीही चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या सहसचिवांनी सिन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. सिन्नर नगरपालिकेसाठी कडवा धरणातून २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेचे पाणी सिन्नरकरांना येऊ लागल्याने ठेकेदाराने योजनेतील त्रुटी दूर न करता योजना नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास प्रयत्न केले. त्यानुसार नगरविकास विभागाने ती योजना ठेकेदाराकडून नगरपालिकेने ताब्यात घ्यावी, असे आदेश दिले. मात्र, योजनेत अनेक त्रुटी असल्याने अपूर्ण कामे पूर्ण करून घेणे उचित ठरणार असल्याने माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारुवाले, अनिल वराडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव (नवि-२) नगरविकास विभाग यांना पत्र दिले. त्यांनी तातडीने नगरविकास विभागाचे सहसचिव पां. जो. जाधव यांना ती योजना हस्तांतरित करण्यास व देयके देण्यास स्थगिती दिली आहे..
----------------
अहवाल सादर करण्याचे आदेश
आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर शहरातील जनतेसाठी जिव्हाळ्याच्या या योजनेतील सर्व त्रुटी दूर होईपर्यंत तिच्या हस्तांतरणास स्थगिती देण्याची मागणी प्रधान सचिव (नवि-२) नगरविकास विभाग यांना केली. त्यानुसार सहसचिव पांडुरंग जाधव यांनी सहा वर्षांपासून काम सुरू असलेल्या योजनेच्या कामाचा चौकशी अहवाल व माजी नगराध्यक्ष उगल, दारुवाले व वराडे यांनी दिलेल्या निवेदनातील मुद्द्यांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.