जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:17 AM2021-09-21T04:17:43+5:302021-09-21T04:17:43+5:30
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची वर्षभरापूर्वी नाशिक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट व ...
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची वर्षभरापूर्वी नाशिक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट व त्यानंतरच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल त्यांच्या काळात झाली. त्यामुळे त्यांची प्रतिमा उजळली. मात्र पोलीस उपमहासंचालक रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी सचिन पाटील यांचे नाव चर्चेत आले होते, त्याच बरोबर जिल्ह्यातील काही विशिष्ट लोकप्रतिनिधीवगळता पाटील यांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली जात होती. खुद्द पोलीस दलातही ही खदखद होती त्यामुळे त्यांची बदली गेल्या आठवड्यात करण्यात आली होती. मात्र त्यांच्या बदलीच्या विरोधात विशिष्ट व्यक्तींनी सोशल मीडियावर चळवळ चालवून पाटील यांच्या बदलीला विरोध दर्शविला होता. शहरात या संदर्भात फलक लावले असता, पोलीस आयुक्त व मनपाने ते काढून नेले होते. मात्र नाशिकमध्ये नियुक्ती होऊन कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना बदली झाल्याच्या विरोधात पाटील यांनी मॅटमध्ये धाव घेतली असता, मॅटने बदलीला स्थगिती दिल्याचे वृत्त आहे. मात्र ही स्थगिती डिसेंबरपर्यंतच असल्याची चर्चा आहे.