महिला तलाठी बदलीवरील स्थगिती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:19 AM2021-08-24T04:19:45+5:302021-08-24T04:19:45+5:30
नाशिक: येवला येथील महिला तलाठ्यांच्या बदल्या करताना येवला प्रांतधिकाऱ्यांनी बदली कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचे निरीक्षण नोंदवत ...
नाशिक: येवला येथील महिला तलाठ्यांच्या बदल्या करताना येवला प्रांतधिकाऱ्यांनी बदली कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचे निरीक्षण नोंदवत मॅट न्यायालयाने या बदल्यांना स्थगिती दिली आहे.
येवला येथील तलाठ्यांचे बदली प्रकरण सध्या जिल्ह्यात गाजत असून मॅट न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. येवला प्रांताधिकाऱ्यांनी बदली नियमांचा भंग करून आन्यायकारक बदली केल्याचा आरोप करीत तलाठी महिलांनी थेट मॅट न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सोमवारी मुंबईत मॅट न्यायालयात सुनावणी होऊन त्यांच्या बदलीवरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या ७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
महिला तलाठ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करताना येवला प्रांताधिकाऱ्यांनी मुदतपूर्व बदल्यांचा कायदा २००५ च्या कलम ४(५) नुसार जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घेणे अपेक्षित असताना तसे केल्याचे दिसून येत नसल्याचा आक्षेप मॅटच्या न्यायमूर्ती श्रीमती मेधा गाडगीळ यांच्या खंडपीठाने नोंदविला आहे. या आधारावर त्यांनी बदलीला स्थगिती दिली आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी ७ सप्टेंबर रोजी होणार असून तोपर्यंत प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या बदली आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.
याप्रकरणी याचिकाकर्त्या दोन्ही महिला तलाठी यांच्यावतीने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला तर राज्य शासनाच्यावतीने ॲड. श्रीमती क्रांती गायकवाड यांनी बाजू मांडली.