डोक्यावरील हंडा उतरला जमिनीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:29 PM2021-03-22T23:29:30+5:302021-03-23T01:21:15+5:30
सुरगाणा : खुंटविहीर मोहपाडा येथे महिलांना पाणी वाहतूक करण्यासाठी संस्थेमार्फत वेल्लो वॉटर व्हील ड्रमचे वितरण करण्यात आले.
सुरगाणा : खुंटविहीर मोहपाडा येथे महिलांना पाणी वाहतूक करण्यासाठी संस्थेमार्फत वेल्लो वॉटर व्हील ड्रमचे वितरण करण्यात आले.
पाण्याच्या एक-एक थेंबाकरिता आदिवासी भगिनींची रानावनातील भटकंती थांबायला हवी. जीवनभर चाललेला हा पाण्याकरिताचा संघर्ष स्वातंत्र्याची पंचाहत्तरी ओलांडून तरी थांबणार का, अशी खंत सेवा सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्ष शिल्पा शिंदे यांनी खुंटविहीर मोहपाडा येथे महिलांना वेल्लो वॉटर व्हील ड्रमचे वितरण प्रसंगी व्यक्त केली.
यावेळी संस्थेच्या संचालक मनिषा निकुंभ, प्रियंका भंडारे, शाम चव्हाण, स्वप्निल साळवे, जलपरिषद सदस्य शिक्षक रतन चौधरी, अरुण सुबर, पोलीस पाटील मनिराम पाडवी, शिवा धुम, परशराम पाडवी, सावित्री वळवी, यशवंत वाघमारे आदी उपस्थित होते.
पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी मदतीचा हात पुढे करीत संस्थेने महिलांना सहजरीत्या पाणी आणता आले पाहिजे. पाणी हा महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाण्याकरिता डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या भगिनींना डोक्यावर हंडा घेऊन उन्हातान्हाची, विंचू काट्याची पर्वा न करता, रात्री अपरात्री जीव धोक्यात घालून पाण्याच्या शोधात हिंडावे लागते, याकरिता संस्थेच्या वतीने पन्नास कुटुंबांना नीर चक्राचे वाटप करण्यात आले आहे.
महिलांच्या डोक्यावरचा भार कमी व्हावा, तसेच पाण्याकरिता सोसावे लागणारे कष्ट, संघर्ष टाळता आला पाहिजे. कमी वेळात जास्त पाणी आणता यायला हवे. कष्टकरी महिलांचा वेळ वाचला पाहिजे. पाणी डोक्यावर वाहताना मणक्याचे विकार, पाठदुखी, कंबर, मान, हात पाय दुखणे ही दुखणी टाळता आली पाहिजेत. या हेतूने या गावात वेल्लो व्हॉटर व्हील ड्रमचे वाटप करण्यात आले.
यावेळी यशवंत वाघमारे, धवळू पाडवी, गोविंदा पालवी, जाणू पाडवी, सीताराम वाघमारे, दीपक पवार, सोनिराम वाघमारे, परशुराम वाघमारे आदी उपस्थित होते.