मानोरी ते मुखेड फाटा रस्त्यावर गुडघ्याएवढे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:12 AM2018-04-23T00:12:51+5:302018-04-23T00:12:51+5:30
येथील मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक रस्ता दिवसेंदिवस अतिशय गंभीर व धोकादायक बनत चालला असून, वाहनचालकांना वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. यातील मानोरी बुद्रुक ते खडकीमाळ या दोन किलोमीटरपैकी सहाशे मीटर (अर्धा किलोमीटर) रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे
मानोरी : येथील मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक रस्ता दिवसेंदिवस अतिशय गंभीर व धोकादायक बनत चालला असून, वाहनचालकांना वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. यातील मानोरी बुद्रुक ते खडकीमाळ या दोन किलोमीटरपैकी सहाशे मीटर (अर्धा किलोमीटर) रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे, परंतु यातील पुढील राहिलेला दीड किलोमीटर रस्ता म्हणजे एक प्रकारे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी भयावह परिस्थितीया जागेवर निर्माण झाली आहे. शेळके वस्तीजवळ गुडघ्याएवढे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे वाहने खड्ड्यात पडून अपघात घडत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर असलेले संपूर्ण दगड, गोटे विस्कळीत झालेले असून, सर्वत्र ते पांगलेले आहेत. त्यामुळे वाहने चालविताना दुचाकी या विस्कळीत दगडांवरून सरकते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. मानोरी बुद्रुक, मानोरी खुर्द आदी गावांतील ग्रामस्थांना येवला येथे जाण्यासाठी हा मुख्य मार्ग असल्याने तसेच येवला, बाभूळगाव येथे महाविद्यालयात येथील मुले शिक्षण घेत असून, मानोरी बुद्रुक येथे परिवहन महामंडळाच्या बस येत नसल्याने काही मुले येवल्याला जाण्यासाठी मानोरीतून थेट पाच किलोमीटर पायी चालत मुखेड फाटा येथे येत असतात. तर काही आपल्या दुचाकीवरून जात असतात. शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी येवला येथे नेत असतात. चार चाकी वाहनांचे नटबोल्ट, पाठे गळून पडल्याच्या घटना या रस्त्यावर घडत आहेत. तसेच मुखेड ते मुखेड फाटा रस्त्यावर रहदारीचे प्रमाण सातत्याने वाढत असून, या रस्त्यावर असलेले खडकीमाळ येथील एल आकाराचे एक धोकादायक वळण असून, या वळणावर नवीन वाहनचालकांना या वळणाचा अंदाज येत नसल्याने वाहने अनेकदा थेट रस्त्यालगत असलेल्या शेतात जाऊन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या अपघाती वळणावर गतिरोधक टाकण्याची मागणी व मानोरी बुद्रुक ते खडकीमाळ या दीड किलोमीटर रस्त्याचे नव्याने डांबरी करण करावे अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून सदर विभागाकडे करण्यात आली आहे.