नवीन रस्त्यावरच खड्डे
By admin | Published: August 3, 2015 10:38 PM2015-08-03T22:38:54+5:302015-08-03T22:39:38+5:30
हरिगिरी महाराज : निधी गेला कु ठे ?
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्यावर खड्डे पडून तो खचला आहे. यासाठी आलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न करून सिंहस्थाच्या कामाकाजावर महंत हरिगिरी महाराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
निलपर्वतावर जाण्याचा रस्ता असो अगर पिंपळदकडे जाण्याचा रस्ता असो, हा रस्ता चांगला केला आहे काय? रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत व बाजूने खचला आहे, तडे गेले आहेत. सहा शेडपैकी दोन शेड अजून अपूर्णच आहेत. या ठिकाणी संपूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. कामे निकृष्ट झाली आहेत. जिल्हाधिकारी म्हणतात, सर्व आखाड्यांपेक्षा जुन्या आखाड्यांसाठी पाच कोटींची कामे झाली आहेत. मग एवढा निधी कुठे खर्च केला, असा प्रश्न त्यांनी केला.
आखाड्यातील पदाधिकाऱ्यांची, साधू-महंतांची व षड्दर्शन आखाडा परिषद पदाधिकाऱ्यांची निवड लोकशाही पद्धतीने होत असते. त्यामुळे माझ्या पदाची चिंता ग्यानदास यांनी करू नये. मी काही स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून मिरवून घेत नाही, असे मत जुना आखाड्याचे महंत तथा संरक्षक हरिगिरी महाराज यांनी ग्यानदासजींच्या वक्तव्यावर व्यक्त केले.
विशेष म्हणजे, हरिगिरी महाराज राजस्थान येथे गेल्यावर ग्यानदास यांनी त्यांच्याविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांचे शनिवारी त्र्यंबक येथे आगमन झाल्यानंतर रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसच्या राज्यात चांंगली कामे झाली. लोकशाहीत सर्वांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कोणी चांगले काम केले तर त्याच्या कामाचे कौतुक करणे गुन्हा आहे काय, असा प्रश्न त्यांनी विचारला.
यापूर्वी मी मुलायमसिंह, मायावती, आजम खान यांच्याही कामाचे कौतुक केले
होते. प्रशासन मला आलोचक समजते. त्यासाठीच मला एखाद्या खोट्या आरोपावरून ते तुरुंगात डांबायलादेखील मागेपुढे पाहणार नाही, असे शेवटी हरिगिरी म्हणाले.(वार्ताहर)