नियतीचे कालचक्र फिरल्याने कुंभार कारागीर गपगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:49 PM2020-04-10T23:49:53+5:302020-04-10T23:50:53+5:30
येवला : कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण उद्योगव्यवस्थाच कोलमडली. गावखेड्यातील छोटे उद्योगही बंद झाले. परंपरागत व्यवसाय असणारा कुंभार कारागीर वर्षभर मेहनत करून उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी माठ बनवतो, कोरोनाच्या संकटाने मात्र बनवलेले माठ घरातच पडून राहिल्याने कुंभार कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चक्र फिरवत नवनिर्मिती करणाऱ्या या कारागिरांना नियतीचे कालचक्र फिरल्याने ऐन हंगामात घरात गपगार बसण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

उन्हाची तीव्रता वाढू लागताच मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये माठ, रांजण गरिबांचे फ्रीज म्हणून बाजारात विक्रीसाठी येत असतात; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू असल्याने गावोगावचे बाजार बंद झाले आहेत. बाजार नाहीत, परिणामी विक्री नाही यामुळे कुंभार कारागिरांपुढे पोटाची खळगी भरायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मार्च, एप्रिल, मे या कालावधीत मातीच्या माठ, रांजण यांना मोठी मागणी असते. यादरम्यान जमा झालेल्या पुंजीवर संपूर्ण वर्षाचे गणित कुंभार कारागीर जमवतात. कोरोना आपत्तीने या व्यवसायावर मोठे संकट ओढवले असून, कुठपर्यंत हे लॉकडाउन चालेल व कधी बाजारपेठ खुली होईल याबाबत साशंकता असल्याने कुंभार कारागीर आर्थिक संकटात सापडला आहे. परंपरागत कला जपत माठ बनवण्याव्यतिरिक्त पोट भरण्याचे दुसरे साधन नसणाºया कुंभार कारागिरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे माठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य माती, उसाचा भुकठा, भाजण्यासाठी लागणारे इंधन यांचा खर्चही अंगावर पडला आहे. शासनाने कुंभार कारागिरांना उदरनिर्वाहासाठी मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. आमचा पिढीजात व्यवसाय आहे.
या व्यवसायात आमची हयात घालवत आहे. आवामध्ये जसा माठ भाजावा तसे आमचे
हृदय माठ तयार करूनही विक्री होत नसल्याने भाजत आहेत.
- रंगनाथ जाधव,
कारागीर, कुसूर