‘कुंभार सशक्तीकरण मिशन’ : विजेच्या चाकावर कुंभारकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:15 AM2019-05-16T00:15:06+5:302019-05-16T00:15:23+5:30
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या सहयोगाने ‘कुंभार सशक्तीकरण मिशन’ अंतर्गत दहादिवसीय कुंभार काम कला प्रशिक्षणाचा शुभारंभ खादी ग्रामोद्योग आयोगाच्या त्र्यंबक विद्या मंदिर येथे करण्यात आला.
नाशिक : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या सहयोगाने ‘कुंभार सशक्तीकरण मिशन’ अंतर्गत दहादिवसीय कुंभार काम कला प्रशिक्षणाचा शुभारंभ खादी ग्रामोद्योग आयोगाच्या त्र्यंबक विद्या मंदिर येथे करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन माती कला बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय कुंभार आणि खादी ग्रामोद्योग कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी राजीव खन्ना यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्रातील कुंभार व्यावसायिक कौशल्यपूर्ण काम करीत असले तरी आजही बहुतेक व्यावसायिक पारंपरिक पद्धतीने आणि कोणत्याही यंत्रसामग्रीचा वापर न करता हातानेच कुंभार काम करीत असतात. पारंपरिक पद्धतीमुळे मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी होत असल्याने कुंभार व्यावसायिकांना म्हणावा तसा आर्थिक लाभ होत नाही. ही समस्या लक्षात घेऊन केंद्र शासनाने शासनाने विजेच्या चाकावर कुंभार कलेचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या मोहिमेअंतर्गत प्रशिक्षणात ४० कुंभार व्यावसायिक सहभागी झाले आहेत.
या आधुनिक यांत्रिक पद्धतीमुळे कुंभार समाजातील तरुण पिढी पुन्हा एकदा पारंपरिक व्यवसायाकडे वळेल यामुळे समाजापुढील बेरोजगारीच्या समस्येवर उपाय निघू शकेल. शिवाय सध्या गुजरात राज्यातून यांत्रिकीकरणामुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक स्पर्धेला तोंड देता येईल, असे जाणकारांचे मत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थीला भविष्यात व्यवसाय सक्षमपणे करता यावा यासाठी १८ हजार रुपये किमतीचे विजेवरील कुंभारी चाक सवलतीत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वीस कुंभारांच्या एका गटाला माती मळण्याचे यंत्रही सवलतीत देण्यात येणार आहे. यावेळी मोहनराव जगदाळे, रंगनाथ सूर्यवंशी, राजेंद्र सावंदे, मनोहर जाधव, ज्ञानेश्वर भागवत, कृष्णा सोनवणे, तुषार गारे, नवनाथ जाधव, किरण शिकारे, पप्पू रसाळ, अरुण भागवत, संतोष सोनवणे, गोरख आहेर आदी उपस्थित होते.
कुंभार कामातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण बोरसरे आणि सतीश बोरसरे हे शिबिरार्थींना विजेवर चालणाऱ्या कुंभारी चाकावर विविध उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत. या प्रशिक्षणार्थींमध्ये दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले साठ वर्षे वयाचे कुंभार कारागीर येवला तालुक्यातील माधवराव शिरसाठ हेदेखील सहभागी झाले आहेत.