पोल्ट्री व्यावसायिक बर्ड फ्लूने धास्तावले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:56+5:302021-01-08T04:44:56+5:30
नाशिक जिल्ह्यातून लगतच्या गुजरात, मध्य प्रदेशबरोबरच मुंबई, ठाणे शहरासह स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची विक्री केली जाते. दररोज लाखो ...
नाशिक जिल्ह्यातून लगतच्या गुजरात, मध्य प्रदेशबरोबरच मुंबई, ठाणे शहरासह स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची विक्री केली जाते. दररोज लाखो पक्ष्यांची निर्यात होत असून, सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने पक्ष्यांची मागणीही वाढलेली असताना आलेल्या नवीन संकटामुळे काही प्रमाणात निर्यातीवर परिणाम झाल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात ९० ते ९२ रुपये प्रति किलो असलेल्या पक्ष्यांचे भाव ७० रुपयांपर्यंत पोहोचल्याने त्याचा मोठा फटका बसला आहे.
चौकट====
महाराष्ट्रात बर्ड फ्लूची साथ नाही, लगतच्या मध्य प्रदेशातदेखील स्थलांतरित पक्ष्यांमध्ये ते आढळले. कोठेही पोल्ट्रीतील पक्ष्यांमध्ये त्याची लागण झाली नाही. मात्र या संदर्भातील वृत्तामुळे पक्ष्यांच्या किमतीवर परिणाम जाणवू लागला आहे.
- अनिल फडके, पदाधिकारी, पोल्ट्री व्यावसायिक संघटना