भगुरला सरकारी जागेवर पोल्ट्री फॉर्म, पक्की घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:18 PM2018-09-25T15:18:02+5:302018-09-25T15:19:48+5:30
भगूरातील सर्व्हे नं.९४५ हा शासनाच्या अखत्यारित येत असून या जागेवर नगरपालिकेने क्रीडांगणाचे आरक्षण टाकल्याचा ठराव पारित केला आहे.
भगुर : भगूर नगरपालिका हद्दीतील सर्व्हे नं. ९४५ या क्रिडांगण आरक्षित सरकारी भुखंडावर अनधिकृत कब्जा करून झोपडपट्टी वसविण्यात आली असून, त्यात पोल्ट्री फार्मसह अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार अॅड. विशाल गोरखनाथ बलकवडे यांनी केली आहे.
या संदर्भात बलकवडे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भगूरातील सर्व्हे नं.९४५ हा शासनाच्या अखत्यारित येत असून या जागेवर नगरपालिकेने क्रीडांगणाचे आरक्षण टाकल्याचा ठराव पारित केला आहे. मात्र काही झोपडपट्टीवासियांनी या जागेवर अतिक्रमण करून वसाहतीसह अवैध धंदे सुरू केले. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही सदर अतिक्रमण हटविले जात नाही. या जागेच्या लगत राम मंदिर असून तीन शाळा व एक व्यायामशाळा आहे. अतिक्रमीत जागेवर गावठी दारू, तंबाखू, गुटखा विक्रीचे अवैध धंदे सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ पहात आहे. सावरकरांची जन्मभूमी असलेल्या या नगरीत देश-विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र येथील बकाल अवस्थेमुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होत असल्याचे म्हटले आहे.
चौकट====
बांधकाम विभाग अधिकारी, कर्मचाºयाविना
बलकवडे यांनी सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणाबाबत माहिती अधिकारात जाणून घेतले असता, मुख्याधिकाºयांनी नगर परिषदेकडे २०१७ पासून कायमस्वरूपी अभियंता नाही व बांधकाम विभागाकडे एकही कर्मचारी नसल्याने कारवाई करणे शक्य झाले नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे येथील प्रशासन त्यांच्या कामात कसूर करत असल्याने त्यांच्या विरोधात भादंवि १६६ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे बलकवडे यांनी सांगितले.