पाटोदा गटात सत्तापरिवर्तन
By admin | Published: February 24, 2017 12:46 AM2017-02-24T00:46:15+5:302017-02-24T00:46:26+5:30
कलाटणी : शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादीच्या ताब्यात
पाटोदा : येवला तालुक्यातील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या पाटोदा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार संजय अंबादास बनकर, पाटोदा गणातून सुनीता अशोक मेंगाणे, तर धुळगाव गणातून मोहन खंडू शेलार विक्रमी मतांनी विजयी झाले असून, त्यांनी सेनेच्या गटात जोरदार मुसंडी मारत सेनेचा बालेकिल्ला ताब्यात घेतला आहे. सुरुवातीपासूनच या गटात राष्ट्रवादी व शिवसेनेत लढत होणार हे स्पष्ट झाले होते. हा गट प्रत्येक वेळेस बदल घडविणारा गट आहे. त्यामुळे या गटातील मतदारांनी संपूर्णपणे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची पाठराखण करीत सेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात देऊन बदल घडविला आहे.
पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे सर्वच उमेदवार आघाडीवर होते. या निवडणुकीच्या निमित्ताने मविप्र संचालक अंबादास बनकर यांचे पुत्र, कृउबा संचालक संजय बनकर, कृउबा संचालक अशोक मेंगाणे यांची पत्नी सुनीता मेंगाणे व धुळगाव गणातून कृउबा संचालक मोहन शेलार निवडणूक रिंगणात असल्याने बनकर, मेंगाणे, शेलार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. (वार्ताहर)