तुटवड्यामुळे वीज ग्राहकांना वीजमीटरची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:15 AM2021-03-10T04:15:56+5:302021-03-10T04:15:56+5:30
पंचवटी : घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या नवीन वीज मीटरसाठी वीज वितरण कंपनीकडे शुल्क भरून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरदेखील वीज ...
पंचवटी : घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या नवीन वीज मीटरसाठी वीज वितरण कंपनीकडे शुल्क भरून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरदेखील वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वेळेत वीजमीटर मिळत नसल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शेकडो ग्राहकांना नव्या वीज मीटरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
गेल्यावर्षी कोरोनामुळे राज्यभरातील थकबाकी वसुली पूर्णतः थांबल्याने वीज वितरण कंपनीच्या तिजोरीत खडखडाट असल्याने वीज वितरण कंपनीला नवीन मीटर खरेदी करता आले नाहीत. त्यामुळेच नव्या ग्राहकांना वेळेत वीज मीटर देण्यास अडचण निर्माण झाली आहे. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते संपूर्ण राज्यभरात वीज मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने वीज ग्राहकांना आणखी महिनाभर तरी वीज मीटरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गेल्या वर्षी संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीने ग्राहकांना मीटर वाचन न करता अंदाजे बिल अदा केले होते. तर जास्तीचे बिल आले म्हणून ग्राहकांनी बिल भरण्यास टाळाटाळ केली. थकबाकी वसुली वेळेत न झाल्याने कंपनी आर्थिक संकटात सापडली. कर्मचारी वेतन, ट्रान्सफार्मर, ऑइल कंडक्टर, पोल खरेदी, विविध कामांचे ठेकेदारांना पैसे देणे, नवीन सबस्टेशन खर्च, दैनंदिन देखभाल दुरुस्ती खर्च असा सर्वच खर्च अचानक वाढल्याने वीज वितरण कंपनीकडे पैशांचा तुटवडा निर्माण झाला. तब्बल वर्षभरापासून थकबाकी वसुली नसल्याने मीटर खरेदी करता आले नाहीत. नवीन वीज मीटरचा तुटवडा संपूर्ण राज्यात भासत असून विभागनिहाय नवीन १०० वीज मीटरची मागणी केली तर प्रत्यक्षात दहा ते वीस मीटर ग्राहकांचे नाव नंबर टाकून येत असल्याने त्यानुसार वाटप करावे लागत आहे.
-----
इन्फो====
अधिकारी म्हणतात औषधालाही मीटर नाही
नवीन वीज मीटर तसेच नादुरुस्त मीटर बदलून मिळावे यासाठी संबंधित ग्राहक वीज वितरण कंपनीत खेटे घालतात. मात्र, वीज मीटर आले नसल्याचे सांगितल्यावर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. वीज मीटर कधी मिळणार याची विचारणा केली तर वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीज मीटर सोडून काही पण मागा. सध्या औषधालाही मीटर नाही असेच उत्तर देतात.