‘रासलीला’मध्ये जिवाला जगदीश बनविण्याची ताकद
By admin | Published: August 14, 2014 09:19 PM2014-08-14T21:19:30+5:302014-08-15T00:35:43+5:30
‘रासलीला’मध्ये जिवाला जगदीश बनविण्याची ताकद
नाशिक : रासलीलामधील पाच अध्याय हे भागवताचे पंचप्राण आहेत. रासलीलेत स्त्री आणि पुरुष यांच्या मीलनाची कथा नव्हे, तर जीव आणि ब्रह्म यांच्या मीलनाचे वर्णन आहे. रासपंचाध्यायात जिवाला जगदीश बनविण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन भागवत कथाकार किरीटभाई यांनी ‘गोपी गीत’ प्रवचनमालेत बोलताना केले.
गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलात नासिक सेवा समिती ट्रस्टच्या वतीने ‘गोपी गीत’ या प्रवचनमालेस आजपासून प्रारंभ झाला. यावेळी किरीटभाई यांनी सांगितले, रासपंचाध्याय माणसाला आसक्ती, मोह यांपासून दूर नेते. ईश्वराचे प्रेम हे अपौरषिय, अलौकिक आहे. ते समजण्यासाठी ईश्वरच तुमच्या शरीरात उतरला पाहिजे. मात्र जेवढी दुनिया तेवढेच आम्हाला ज्ञान असते. जे पाहिले, जे खाल्ले या पलीकडे आपल्याला ज्ञान नसते. भक्ताला ईश्वराची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते. त्याच्यातील दोष लक्षात येत नाही. कन्हय्याची नजरही घायाळ करते. ज्याच्या मनात चैन नाही, परंतु प्रेम आहे तो गोपी. जो खरे प्रेम करतो त्याला विरहातही दु:ख होते; परंतु जेथे विरहातही दु:ख होत नाही तेथे व्यवहार येतो.
रासलीला ही कामविरामलीला असल्याचेही किरीटभाई यांनी सांगितले. प्रारंभी ट्रस्टचे पदाधिकारी ब्रिजलाल धूत, नेमीचंद पोद्दार, राजेश पारीक, जगदीश काबरा, प्रदीप बूब, संजय सोनी, बिमल सराफ आदिंचा सत्कार करण्यात आला. दि. १५ आॅगस्टपर्यंत रोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत ही प्रवचनमाला होणार आहे. (प्रतिनिधी)