शिक्षणामध्ये आर्थिक, सामाजिक परिवर्तनाची ताकद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:18 AM2018-09-08T01:18:56+5:302018-09-08T01:19:13+5:30
शिक्षणात सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. त्यासाठी शिक्षणाला तंत्रज्ञानाची साथ मिळायला हवी. विकसित देशांच्या बरोबरीने आपल्याला प्रगती करायची असेल तर शिक्षणाच्या आधुनिक सुविधा व चांगल्या दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागापर्यंतही पोहोचायला हवे. याच हेतूने आपण धुळे जिल्ह्यातील गावागावांमधील शाळांमध्ये संगणक पोहोचविण्याचे काम हाती घेतले असल्याचे प्रतिपादन डिजिटल मॅन हर्षल विभांडिक यांनी केले आहे.
नाशिक : शिक्षणात सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. त्यासाठी शिक्षणाला तंत्रज्ञानाची साथ मिळायला हवी. विकसित देशांच्या बरोबरीने आपल्याला प्रगती करायची असेल तर शिक्षणाच्या आधुनिक सुविधा व चांगल्या दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागापर्यंतही पोहोचायला हवे. याच हेतूने आपण धुळे जिल्ह्यातील गावागावांमधील शाळांमध्ये संगणक पोहोचविण्याचे काम हाती घेतले असल्याचे प्रतिपादन डिजिटल मॅन हर्षल विभांडिक यांनी केले आहे.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समिती यांच्या संयुक्त गौरव सोहळ्यात शुक्रवारी (दि. ७) ते बोलत होते. व्यासपीठावर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्यासह वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, डॉ. धर्माजी बोडके, किशोर पाठक, रमेश देशमुख, मधुकर झेंडे आदी उपस्थित होते. हर्षल विभांडिक म्हणाले, विकसित देशांच्या तुलनेत भारतात अजूनही शिक्षणाच्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या नाही. शिक्षणाच्या आधुनिक सुविधा व चांगल्या दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागापर्यंतही पोहोचविण्यासाठी शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणानंतरही रोजगार मिळत नसल्याने युवावर्ग अस्वस्थ तरुण गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत आहे. त्यामुळे या सामाजिक परिस्थितीत बदल करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची गरज असल्याचे मत हर्षल विभांडिकयांनी व्यक्त केले.
नागरिक शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष प्रा. यशवंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अमृता कविश्वर यांनी केले. अॅड. भानुदास शौचे यांनी आभार मानले.
पुरस्कारार्थी शिक्षक
सावानातर्फे आयोजित शिक्षक गौरव सोहळ्यात प्राथमिक विभागात दीपाली रायते, प्रमिला आहेर, मोहिनी भगरे, सुनीता जाधव यांचा तर माध्यमिक विभागात पुष्पा चोपडे, ज्ञानेश्वर महाजन, विजय म्हस्के, लक्ष्मण जाधव यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. उच्च माध्यमिक विभागात मीनाक्षी पानसरे, महाविद्यालयीन विभागात अशोक बोºहाडे, दिलीप शिंदे, वसंत वाघ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा विभागात चंद्रकांत भाग्यवंत, कला विभागात संजय बागुल, शास्त्रीय संगीत विभागात शशिकांत मुजुमदार यांच्यासह विशेष गौरवार्थी म्हणून विद्या फडके व रमेश जाधव यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्यावसायिक विभागात डॉ. विजय बिरारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये प्राथमिकचे उत्तमराव देवरे, माध्यमिकचे वासुदेव शिंगणे, महाविद्यालयीनमध्ये प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.
विशेष पुरस्कारार्थी
सावाना आणि नागरिक शिक्षक गौरव समितीच्या शिक्षक गौरव सोहळ्यात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची कन्या रविजा सिंगल, डॉ. विश्वास मंडलिक, धावपटू संजीवनी जाधव, नौकानयनपटू दत्तू भोकनळ, किशोर काळे यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दत्तू भोकनळ यांचा पुरस्कार त्यांचे बंधू गोकुळ भोकनळ तर संजीवनी जाधव यांचा पुरस्कार प्रशिक्षक निरंजन गायकवाड यांनी स्वीकारला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्यासाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांचे आई व वडीलही उपस्थित होते.