सब स्टेशनच्या बिघाडामुळे विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:14 AM2021-03-27T04:14:36+5:302021-03-27T04:14:36+5:30
इंदिरानगर : महावितरण कंपनीच्या पाथर्डी सब स्टेशनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास आणि परीक्षा ...
इंदिरानगर : महावितरण कंपनीच्या पाथर्डी सब स्टेशनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास आणि परीक्षा देण्यास अडथळा निर्माण होत असल्याने विद्यार्थी व पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पाथर्डी सब स्टेशनमधून इंदिरा नगर, राजीव नगर, सार्थक नगर, श्रद्धा विहार कॉलनी, शिव कॉलनी, पांडव नगरी, सराफ नगर, चेतना नगर, राणे नगर, दाढेगाव, पाथर्डी, वासन नगर, प्रशांत नगर, आदी परिसरातील सुमारे पन्नास हजार ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. बुधवारी (दि. २४) महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, देवेंद्र सोसायटी, आयटीआय कॉलनी, मानस कॉलनी आदी भागात सकाळी आठ ते दुपारी बारा या दरम्यान तीन ते चारवेळा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. २५) सकाळी आठ ते दुपारी बारा या दरम्यान सहा ते सातवेळा विद्युत पुरवठा खंडित झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे घरीच ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. तसेच परीक्षाही ऑनलाईन घेण्यात येत आहे. परंतु, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच ऐन उन्हाळ्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. विद्युत पुरवठा वारंवार खंडित झाल्याने परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.