मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 04:45 PM2020-08-08T16:45:50+5:302020-08-08T19:19:41+5:30
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सहा दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, देवगाव परिसरातील दहा ते बारा गावांमध्ये चार दिवसांपासून काळोख दाटला आहे. वैतरणा सब स्टेशन येथील रिलेमध्ये बिघाड झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. तर मुसळधार पावसामुळे परिसरात धुक्याने झालर पसरली असल्याचे दृष्य मोहून घेत आहे.

पावसाळा सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला असतानाही आवश्यक असा पाऊस झाला नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. परिणामी पूर्ण खरीप हंगाम पावसाअभावी वाया जातो की काय याची धास्ती बळीराजाला लागली होती. मात्र, आश्लेषा नक्षत्रात जोरदार पावसाला सुरु वात झाली आहे. या पावसाने शेतकरी सुखावला असला तरी विजेच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. देवगाव परिसरात वावीहर्षे, श्रीघाट, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, चंद्राचीमेट, आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्षे, आळवंड आणि झारवड आदी गावांना विजेच्या समस्यांनी ग्रासले असून विजेअभावी विजेवर चालणारे मोबाइल, फ्रीज, मिक्सर आदी उपकरणे बंद अवस्थेत आहेत. पिठाची गिरणी विजेअभावी बंद असून येथील नागरिकांना मोखाडा तालुक्यातील दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडाळा या ठिकाणी दळणासाठी जावे लागते. वीजपुरवठा खंडित असल्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावर पिण्याचे पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.