महिनाभरापासून विजेचा लपंडाव; वाडीवऱ्हे परिसरात नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:19 AM2021-09-07T04:19:11+5:302021-09-07T04:19:11+5:30
वाडीवऱ्हे परिसरात एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. लोकसंख्या वाढल्याने तसेच विजेच्या उपकरणावरील साधने वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. ...
वाडीवऱ्हे परिसरात एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. लोकसंख्या वाढल्याने तसेच विजेच्या उपकरणावरील साधने वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. परंतु वीज वितरण करणारे ट्रान्सफार्मर पूर्वीचेच आहेत. त्यामुळे अतिरिक्त दाबामुळे हे ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. आठ दिवसांत चार ते पाच ट्रान्सफार्मर जळाले आहेत. मागील आठवड्यात सलग चार दिवस संपूर्ण गाव अंधारात होते. नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र, पोलिसांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर आंदोलनास परवानगी नाकारल्याने आंदोलन करण्याचा निर्णय स्थगित करून शाखा अभियंता यांना निवेदन दिले. निवेदनात २०० केव्हीचे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत, एक ट्रान्सफार्मर नवीन बसविण्यात यावा, जीर्ण झालेले खांब आणि तारा बदलण्यात यावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण कातोरे, शिवसेनेचे पंडित कातोरे, ज्ञानेश्वर मालुंजकर, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास टीळे, तानाजी भोर, तानाजी शेजवळ, गणपत शेजवळ, गणेश मालुंजकर, यशवंत लाहंगे, रवी अस्वले, वैभव कातोरे, दीपक भोर, विलास चोथे, बाळू बोराडे, दीपक शेजवळ आदींसह नागरिक उपस्थित होते.