पुरवठा खंडित होऊन विजेचा लंपडाव ; झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्या विद्युत तारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:28 PM2020-07-10T17:28:32+5:302020-07-10T17:29:22+5:30
नाशिक शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युततारा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहे. त्यामुळे जोराचा वारा अथवा पाऊस आल्यास या विद्युत तारांच्या घर्षणातून शॉर्ट सर्किट होऊन परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात.
नाशिक : शहरातील विविध भागांत विद्युत तारांच्या देखभाल दुरुस्तीअभावी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. शरणपूररोड परिसरातही असा प्रकार सुरू असून, रस्त्यावरील विद्युततारा झाडांच्या फाद्यांमध्ये अडकल्या आहेत. मात्र महावितरण या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युततारा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहे. त्यामुळे जोराचा वारा अथवा पाऊस आल्यास या विद्युत तारांच्या घर्षणातून शॉर्ट सर्किट होऊन परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. मात्र विद्युत विभागाकडून केवळ सोयीस्कर असलेल्या फांद्या छाटल्या जात असल्याने अनेक ठिकाणी विद्युततारा झाडांच्या फाद्यांमध्ये अडकलेल्या अवस्थेत आहेत. एकीकडे मान्सूनपूर्व उपाययोजना म्हणून अशाप्रकारे विद्युततारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या अशास्त्रीय पद्धतीने छाटल्या जात आहे. त्यामुळे झाड एक बाजूने झुकल्याने पाऊस अथवा हवेने उन्मळून पडण्याचा धोका निर्माण होत आहे, तर दुसरीकडे झाडांच्या फांद्या विद्युत खांबांच्या उंचीवर असलेल्या तारांच्याही वर वाढल्याने वारंवार विद्युत प्रवाह खंडित होण्याचे प्रकार होत असताना महावितरणचे याकडे दुर्लक्ष होताना आहे.