पाथरेखुर्दची सत्ता आपला पॅनलच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:48+5:302021-01-22T04:13:48+5:30
पाथरे : पाथरे खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊ जागांसाठी १९ उमेदवारांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत आपला पॅनलच्या सात उमेदवारांनी बाजी ...
पाथरे : पाथरे खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊ जागांसाठी १९ उमेदवारांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत आपला पॅनलच्या सात उमेदवारांनी बाजी मारली, तर ग्रामविकास पॅनलला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. सिन्नर व कोपरगाव तालुक्याच्या राजकीय विचारांचा प्रभाव असलेल्या या गावातील कोणतीही निवडणूक असो अतिशय चुरशीची होत असते. त्यामुळे या गावाच्या निवडणुकीच्या निकालाचे आकडे सिन्नरप्रमाणेच कोपरगाव तालुक्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष केंद्रित करत असतात. आपला पॅनल व ग्राम विकास पॅनल यांच्यातील अतिशय चुरशीच्या या लढतीत प्रभाग १ मध्ये आपला पॅनलचे बाबासाहेब चिने ( १४६), सुरेखा चिने (१५०) यांनी, तर ग्रामविकासाच्या सीमा गुंजाळ (१४३) यांनी विजय संपादन केला आहे. या प्रभागात सोन्याबाई गुंजाळ व सीमा गुंजाळ या सासू-सुना आमने-सामने होत्या. या लढतीत सूनबाई सीमाने सासूबाई सोन्याबाईवर बारा मतांनी आघाडी घेत विजय संपादन केला आहे. प्रभाग २ मध्ये आपला पॅनलचे विष्णू बेंडकुळे(१७९), मंगल मोकळ (२०६) , पूनम डोंगरे (२१४) हे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग २ मध्ये विष्णू बेंडकुळे आणि अरुण बर्डे या मामा भाच्याच्या लढतीत मामा विष्णू बेंडकुळेने भाचा अरुणला ३९ मतांनी धोबीपछाड देत विजय खेचून आणला. प्रभाग तीनमध्ये आपला पॅनलचे दिनकर गुंजाळ (४१८), दत्तू चिने (४२२) विजयी झाले, तर परिवर्तन पॅनल च्या सुशीला गिते (४९७) विजयी झाल्या आहेत. प्रभाग एकचे सागर घुमरे, सोन्याबाई गुंजाळ, अश्विनी चिने, प्रभाग दोनचे अरुण बर्डे, पंचक्षीला मोकळं, नंदा पडवळ, प्रभाग तीनचे नानासाहेब गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, हरिदास चिने, सरिता गावडे आदी पराभूत झाले. आपला पॅनलने गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
फोटो- आपला पॅनलच्या विजयी उमेदवारांसमवेत समर्थक, कार्यकर्ते, ग्रामस्थ. (२१ पाथरे २)