नाशिकचे सत्ताशकट कुणाच्या हाती?

By Admin | Published: February 23, 2017 12:46 AM2017-02-23T00:46:28+5:302017-02-23T00:46:45+5:30

आज निकाल : महापालिकेसाठी मतमोजणी

Power of power in Nashik? | नाशिकचे सत्ताशकट कुणाच्या हाती?

नाशिकचे सत्ताशकट कुणाच्या हाती?

googlenewsNext

नाशिक : जिल्हा परिषद, पंचायत समिती महापालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (दि.२३) मतमोजणी होणार आहे. नाशिक जिल्हावासीयांनी सत्ताशकट कुणाच्या हाती सोपविले, याचा फैसला आज दुपारपर्यंत होणार आहे.
दीड तासात कौल स्पष्ट होणार
विक्रमी मतदानानंतर महापालिकेसाठी गुरुवारी (दि.२३) मतमोजणी होत आहे. महापालिकेतील ३१ प्रभागांमधील १२२ जागांकरिता ८२१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यंदा प्रथमच दोन तास विलंबाने म्हणजे सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. पहिल्या दीड तासातच दहा प्रभागांमधील ४० जागांचा निकाल हाती येणार आहे. त्यामुळे कौल स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.  नाशिक महापालिकेसाठी मंगळवारी (दि.२१) शहरातील १४०७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते. यंदा प्रथमच मतांचा टक्का वाढून ६१.६० टक्के मतदान नोंदविले गेले. १० लाख ७३ हजार ४०८ मतदारांपैकी ६ लाख ६१ हजार १९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ३ लाख ५६ हजार ८५५ पुरुष, ३ लाख ४ हजार ३४१ स्त्री तर ३ इतर मतदारांचा समावेश होता. यंदा विक्रमी मतदान झाल्याने उलथापालथ होण्याचे संकेत मिळत असून, पुढील पाच वर्षांकरिता महापालिकेचे सत्ताशकट कोण हाकणार, याबाबत कमालीची उत्कंठा ताणली गेली आहे. यंदा प्रथमच सकाळी १० वाजेनंतर मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येणार आहे.  दहा ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली असून, त्यात नऊ ठिकाणी प्रत्येकी तीन तर सातपूर भागात चार प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी ४८८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. पश्चिम व सिडको विभागात प्रत्येकी ९ तर पूर्व, नाशिकरोड विभागातील मतमोजणी केंद्रांवर प्रत्येकी १० टेबलांची व्यवस्था करण्यात येणार आहे. पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३, १४ आणि १५ तसेच सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८, ९, १० व ११ याठिकाणी ईव्हीएमची संख्या अधिक असल्याने प्रत्येक प्रभागनिहाय १२ टेबलांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक १७, १८ आणि १९ या प्रभागांसाठी टपाली मतपत्रिका मोजण्याकरिता स्वतंत्र दोन तर अन्य मतमोजणी केंद्रांवर प्रत्येकी एक टेबलची व्यवस्था असणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर एक प्रभागाची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंंतर दुसऱ्या प्रभागाच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
पहिल्या दीड तासात
दहा प्रभागांचा निकाल
सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया दहाही केंद्रांवर एकाचवेळी सुरू होणार आहे. मतदान यंत्र दहा टेबलांवर मांडल्यानंतर मतदान प्रतिनिधींना दाखवून त्यांच्या मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वप्रथम प्रभाग क्रमांक १, ४, ७, १३, १६, १७, २०, २५, २७ आणि ८ या प्रभागांची मतमोजणी होऊन ११.३० ते १२ वाजेपर्यंत निकाल हाती येणे अपेक्षित आहे. त्यामुळे दहा प्रभागांमधील ४० उमेदवारांचा कौल समजणार आहे. त्यातूनच महापालिकेत कुणाच्या हाती सत्ताशकट जाते, याचीही दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.
पूर्व आणि सातपूरमध्ये
लागणार विलंब
नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३, १४ आणि १५ साठी मतमोजणी प्रक्रिया महात्मा फुले कलादालनात होणार आहे. याठिकाणी प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वाधिक ६१ ईव्हीएम असल्याने १२ टेबल लावण्यात आले असून, पाच फेऱ्या होण्याची शक्यता आहे. तसेच सातपूर विभागात प्रभाग ८, ९, १० आणि ११ या चार प्रभागांची मतमोजणी सातपूर क्लब हाऊस येथे होत असून, येथेही अधिकृत निकालास विलंब होण्याची शक्यता आहे.
मोबाइल जॅमर
मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल जॅमर लावण्यात येणार आहे. याठिकाणी शासकीय कामाव्यतिरिक्त अन्य कुणालाही मोबाइलचा वापर करता येणार नाही. शिवाय केंद्रापासून ४ कि.मी. पर्यंत बॅरिकेडिंग केले जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Power of power in Nashik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.