शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता
By admin | Published: February 19, 2017 11:09 PM2017-02-19T23:09:21+5:302017-02-19T23:09:39+5:30
तोफा थंडावल्या : आठवडे बाजाराची संधी साधत, सभा-रॅलींद्वारे मतदारांशी संपर्क
नाशिक : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्या सात दिवसांपासून धडाडणाऱ्या तोफा रविवारी थंडावल्या. गटातील मोठ्या गावांमध्ये विविध पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी प्रचारफेऱ्या काढून शक्तिप्रदर्शन केले. तर काही उमेदवारांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही घरोघरी जाऊन प्रचार करणेच पसंत केले. मागील सात दिवसांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचारासाठी अगदी कमी कालावधी मिळाल्याने गट आणि गणातील प्रत्येक गावातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. सकाळपासून संधाकाळपर्यंत पायपीट करून त्यांनी गावोगावच्या मतदारांपर्यंत आपले प्रचार पत्रक पोहोचविले. सकाळपासून सायंकाळपर्यंतचे नियोजन करून कार्यकर्त्यांसह गावोगावच्या स्थानिक नेतेमंडळींना बरोबर घेउन प्रचारफेऱ्या काढल्या. बहुतेक सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी वाहनांवर ध्वनीक्षेपक लावून गावोगावी प्रचार केला.
महापालिका निवडणुकांचा जाहीर प्रचार रविवारी सायंकाळी ५.३० वाजता संपला असला तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रचाराची मुदत रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत असल्यामुळे गावोगावी रात्री उशिरापर्यंत उमेदवार आणि त्यांचे समर्थक फिरताना दिसून येत होते. इगतपुरी तालुक्यात घोटीसह काही गावांमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करून पक्षीय उमेदवारांनी एकत्रीतपणे प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेत शक्तिप्रदर्शन केले. चांदवड तालुक्यात बहुतेक उमेदवारांनी घरोघरी जाउन प्रचार करणे पसंत केले. कॉँग्रेसने काजीसांगवी येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची तर भाजपाने दुगाव येथे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची जाहीर सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. सिन्नर तालुक्यात वावी, नांदूरशिंगोटे, मुसळगाव, वडांगळी, ठाणगाव, देवपूर, पांढुर्ली यासारख्या गावांमध्ये गट आणि गणातील उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
पेठ, सुरगाणा, दिंडोरी या आदिवासी तालुक्यांमध्ये उमेदवारांनी आदिवासी पाड्यांवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला. नांदगाव तालुक्यात कॉँग्रेसने न्यायडोंगरी येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा घेतली. सटाणा तालुक्यात भाजपाने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत प्रचारफेरी काढली. शिवसेनेने सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत लखमापूर आणि नामपूर या दोन ठिकाणी प्रचारफेरी काढली. कळवण तालुक्यात रविवारी कनाशीचा आठवडे बाजार असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे या ठिकाणी प्रचारफेरी काढली. तर इतर पक्षाच्या उमेदवारांनी बाजाराची संधी साधून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. रात्री बारा वाजेपर्यत प्रचाराला वेळ मिळाल्याने रात्री उशिरापर्यंत गावा गावात उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या चौक सभा सुरू होत्या.