आर्थिक धोरणामुळे कामगार संघटनांची शक्ती खिळखिळी : भालचंद्र कांगो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:17 AM2018-11-25T01:17:00+5:302018-11-25T01:17:45+5:30
भाजपा सरकार शेतकरी व कामगारांच्या विरोधात धोरण आखून अन्याय करत आहे. या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारच्या विरोधात कामगार, शेतकरीवर्ग एकवटला असून, सर्व संघटनांच्या वतीने एल्गार पुकारला आहे.
नाशिक : भाजपा सरकार शेतकरी व कामगारांच्या विरोधात धोरण आखून अन्याय करत आहे. या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारच्या विरोधात कामगार, शेतकरीवर्ग एकवटला असून, सर्व संघटनांच्या वतीने एल्गार पुकारला आहे.
जानेवारी महिन्यात होणाऱ्या देशव्यापी संपात मोठ्या संख्येने सहभागी होऊन ताकद दाखवावी. कामगारविरोधी व नवीन आर्थिक धोरणांमुळे संघटनांची शक्ती खिळखिळी झाली आहे, असे प्रतिपादन भाकपचे राष्टय सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.
आयटकच्या वतीने आयोजित दोनदिवसीय १८व्या त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी कांगो बोलत होते. आयटकचे प्रदेशाध्यक्ष सुकुमार दामले हे अध्यक्षस्थानी होते. श्रीकृष्ण लॉन्स येथे होत असलेल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन शर्मा, महासचिव देवीदास तुळजापूरकर, श्यामजी काळे, राजू देसले आदी उपस्थित होते.
यावेळी कांगो म्हणाले, बेरोजगारी, असंघटित कामगारांचे प्रश्न, किमान वेतनाच्या प्रश्नासह विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत; मात्र या सरकारला या समस्यांशी देणे-घेणे नाही. सरकार केवळ सर्वसामान्य जनतेच्या विरोधात निर्णय घेण्यात मग्न आहे.
कायदा-सुव्यवस्था व संविधानाने दिलेले अधिकार हे धोक्यात आले आहे. देशातील सर्व कायदे बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न भाजपा सरकारने चालविला आहे. जानेवारीमध्ये पुकारण्यात आलेला संप हा संविधान वाचविण्यासाठीदेखील असणार आहे. कामगार संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचे महाराष्टला दिसून येईल, असा दावा त्यांनी केला. अधिवेशनामध्ये ८ व ९ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदबाबत नियोजन, कामगारविरोधी संकटांवर मात करण्यासाठी चर्चा, सरकारच्या कामगारविरोधी धोरणांवर विचारमंथन करण्यात येत आहे. दुपारच्या सत्रात कृषी अभ्यासक मिलिंद मुरुगकर यांनी शेतकरी कामगारांच्या चळवळीची एकजूट ही काळाची गरज या विषयावर मत मांडले.