नाद, नृत्य, मंत्रांनी सजली प्रभात; पारंपरिक वेशभूषेतील मिरवणुकांनी नववर्षाचा प्रारंभ
By धनंजय रिसोडकर | Published: March 22, 2023 03:37 PM2023-03-22T15:37:34+5:302023-03-22T15:38:01+5:30
नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि नाशिक मनपाच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पद्धतीने काढलेल्या स्वागत यात्रांनी सकाळपासूनच गुढीपाडव्याची अर्थात नववर्ष स्वागताची वातावरणनिर्मिती केली.
नाशिक : शहरातील विविध रस्त्यांसह चौकांमध्ये काढलेल्या रांगोळ्या, उभारलेल्या उंच गुढ्या, कुठे ढोल - ताशे, कुठे शास्त्रीय नृत्यवंदना, कुठे पाठशाळेतील ब्रह्मवृंदाकडून शांतिमंत्रांचे पठण, कुठे लेझीम तर कुठे पारंपरिक वेशातील बालक, बालिका, युवक-युवतींसह आबालवृद्धांच्या सहभागाने रंगलेल्या मिरवणुकांनी शहरात हिंदू नववर्षाचे स्वागत अत्यंत जल्लोषात करण्यात आले. घरोघरी पारंपरिक पद्धतीने सकाळीच रेशमी वस्त्रांसह हार-गाठ्या आणि कडूनिंबासह आंब्याच्या डहाळ्यांनी सजलेल्या उंच गुढ्या उभारत नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि नाशिक मनपाच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पद्धतीने काढलेल्या स्वागत यात्रांनी सकाळपासूनच गुढीपाडव्याची अर्थात नववर्ष स्वागताची वातावरणनिर्मिती केली. नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र शुद्ध प्रतिपदा श्री शालीवाहन शके १९४५, शोभन संवत्सरारंभ म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नववर्ष या मंगल पर्वाचे भव्य स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागत समितीच्यावतीने पारंपरिक गुढी उभारून भारतमातेचे देखील पूजन करण्यात आले. नाशिकमधून श्री साक्षी गणपती मंदिर, श्री काळाराम मंदिर आणि कौशल्यानगर रामवाडी या तीन धार्मिक स्थानांवरून बुधवारी (दि. २२) नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात व मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते गुढीपूजन पार पडले. यावेळी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे, गिरीश निकम उपस्थित होते. या स्वागत यात्रांच्या नियोजनासह आयोजनात वृषाली घोलप, सुचेता भानुवंशे, प्रदीप भानुवंशे, मोहन गायधनी, प्रतीक शुक्ल, अश्विनी चंद्रात्रे, प्रियंका लोहिते, केतकी चंद्रात्रे, मंदार कावळे, केदार शिंगणे, बापू दापसे, शेखर जोशी, कौस्तुभ अष्टपुत्रे, शिवम बेळे, शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, महेश महांकाळे, प्रसाद गर्भे यांनी विशेष परिश्रम घेतल्याने यंदाच्या नववर्ष स्वागत समारंभाला नागरिकांचाही अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या तिन्ही यात्रांचा समारोप पाडवा पटांगण, दुतोंड्या मारुती शेजारी, गोदाघाट येथे झाला.