प्रबोधनकार ठाकरे उद्यानाला अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:52 AM2018-11-11T00:52:21+5:302018-11-11T00:52:49+5:30
शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या आणि अतिशय महत्त्वाकांक्षी ठरू शकणाºया आनंदवल्लीतील गोदावरी नदीकाठावर सुमारे २० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या कै. प्रबोधनकार के. सी. ठाकरे उद्यानाची दयनीय अवस्था झालेली आहे.
सातपूर : शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या आणि अतिशय महत्त्वाकांक्षी ठरू शकणाºया आनंदवल्लीतील गोदावरी नदीकाठावर सुमारे २० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या कै. प्रबोधनकार के. सी. ठाकरे उद्यानाची दयनीय अवस्था झालेली आहे. महानगरपालिकेने आठ एकर जागेवर त्याकाळी लक्षावधी रुपये खर्चून विकसित केलेले हे उद्यान शहराच्या विकासाचा मोठा टप्पा समजला जात होता. मात्र मनपा प्रशासन सोडा लोकप्रतिनिधींनाही अशा प्रकल्पाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नसल्याने उद्यानाचे वैभव इतिहासजमा झाले आहे.
एरव्ही ऊठसूट अस्मितेचा मुद्दा उपस्थित करणाºया शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अर्धवट साकारल्या गेलेल्या या उद्यानाविषयी गंभीर नसल्याने आता त्यांच्याच प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. नाशिक महापाालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर मोठे प्रकल्प उभारण्याची स्पर्धा सुरू झाली. अनेक ठिकाणी तर महापुरुषांच्या नावाने वास्तू आणि उद्याने उभारून वास्तुरूपी त्यांचे स्मारक जतन करण्याची तयारी करण्यात आली. याच शृंंखलेत १९९८ साली महापालिकेने गोदावरी नदीच्या काठावर आनंदवल्ली शिवारात आठ एकर जागेवर भव्यदिव्य असे उद्यान विकासासाठी हाती घेतले. त्यासाठी त्यावेळी ६१ लाख रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला.
उद्यानाच्या चारही बाजूला संरक्षक भिंती आणि जाळ्या उभारण्यात आल्या होत्या. आता या जाळ्या चोरट्यांनी गायब केल्या आहेत, तर संरक्षक भिंतीची पडझड झाली आहे. त्यावेळी आकर्षक असे प्रवेशद्वार उभारून त्या प्रवेशद्वारावर कै. प्रबोधनकार के. सी. ठाकरे उद्यान नावाची कमान उभारण्यात आली होती. सद्य:स्थितीत ही कमानच गायब झाली आहे. उद्यानात येणाºया पर्यटकांसाठी खाद्यपदार्थांचे ठिकठिकाणी खास गाळे उभारण्यात आले होते. आता या गाळ्यांचे भूतबंगल्यात रूपांतर झाले आहेत.
या उद्यानाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत नाही तोच तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांच्या कार्यकाळात म्हणजेच २००३ मध्ये उद्घाटनाचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या वैभवशाली प्रकल्पाकडे ढुंकूनही पाहिले नाही. तर त्यावेळी महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनेच्या नगरसेवकांना उद्यानाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही.
त्यानंतरच्या काळातही काही
आक्र मक शिवसैनिक नगरसेवक होऊन गेलेत. मात्र त्यांनी उद्यानासाठी कधीही आक्र मकता दाखविली नाही .आता १५ वर्षांचा कालावधी लोटला आणि उद्यान होत्याचे नव्हते झाले आहे. या उद्यानावर २० वर्षांपूर्वी खर्च केलेले लाखो रु पये गोदार्पण झाले आहेत.
नवे थीम गार्डन, जुन्यांचे काय?
ज्या संकल्पनेतून या उद्यानाची उभारणी करण्यात आली ती संकल्पना साध्य झालेली नाही. लाखो रु पये मातीमोल घालणाºया प्रशासनाला जाब विचारणार कोण, असा प्रश्न केला जात आहे. आता महापालिकेत कर्तव्यदक्ष आयुक्त म्हणून नावलौकिक मिळविलेल्या तुकाराम मुंढे यांनी आता प्रत्येक विभागात थीम गार्डन उभारण्याची तयारी केली आहे. परंतु अस्तित्वात असलेल्या प्रबोधनकारक ठाकरे यांच्या स्मृती जपणाºया उद्यानाबाबत ते काय भूमिका घेणार, असा प्रश्न केला जात आहे.
शहरालगत गोदावरी नदीकाठावर निसर्गाने नटलेल्या या जागेवर उभारलेल्या उद्यानात पाऊल ठेवताच एक वेगळी अनुभूती येईल असे वातावरण आहे. आजूबाजूला शेतीचा परिसर, नदीच्या समोरच्या काठावर नवश्या गणपतीचे स्थान, जवळून खळाळून वाहणारी गोदामाई असे निसर्गरम्य ठिकाण शोधून सापडणार नाही. आणि सोबतच उद्यानाला प्रबोधनकारांचे नाव. मात्र शिवसैनिकांचे दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने उभारलेल्या
उद्यानाकडे महापालिकेतील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी फिरकून पाहण्यास तयार नाहीत.
सामान्य नागरिक सहज पोहोचू शकतील अशी ठिकाणे सोडून महापालिकेने अनेक ठिकाणी उद्याने विकसित केली आहेत. सातपूर विभागातील प्रा. वसंत कानेटकर उद्यान किंवा हनुमानवाडीतील कुसुमाग्रज हेदेखील अशातीलच आहे. परंतु प्रबोधनकार ठाकरे उद्यान हे गंगापूररोडवरील आनंदवल्लीसारख्या ठिकाणी म्हणजे हमरस्त्यावरील उद्यान आहे. परंतु त्याकडेदेखील लक्ष पुरवले जात नसल्याने अगोदर खर्च कशासाठी केला, असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकरे उद्यान विकसित झाल्यास शहराचे प्रमुख आकर्षण आणि पर्यटन स्थळ म्हणून उदयास येण्यास वेळ लागणार नाही.