आदिवासी वाड्यावस्त्यांवर जावून केले प्रबोधन अनोखा शिक्षकदिन : पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयाच्या शिक्षकांचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 06:04 PM2018-09-05T18:04:36+5:302018-09-05T18:04:56+5:30
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी परिसरातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर जावून शिक्षकदिनी पालकांना प्रबोधक करीत त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले. शिक्षकदिनी शिक्षकांनी केलेल्या या अनोख्या कार्यामुळे त्यांचे समाजकार्य आणखी उजळून निघाले आहे.
पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील सर्वच शिक्षकांनी ५ सप्टेबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून परिसरातील ठाणगाव, पाडळी, ठाकरवाडी, बोगीरवाडी, निंबाची वाडी, पलाट, दत्तवाडी, टोळेवस्ती या छोटया आदिवासी वाड्या-वस्त्यांवर जाऊन तेथील विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची चौकशी केली. शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणामुळे होणारी प्रगती या बाबी व विशेष आपल्या कुटुंबासाठी शिक्षणाची गरज आर. टी. गिरी यांनी पटवून दिली. विदयालय आपल्या पाल्याच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर करून सदैव तुमच्या मदतीला उभे राहून प्रसंगी पालकांनी शिक्षणाची गोडी दाखवल्यास त्यांनाही विदयालय शिक्षणासाठी प्रवृत्त करेल. आपल्या समाजासाठी शिक्षण हीच खरी जीवन
वाहिनी मानून त्याची कास धरावी. शिक्षण नसल्यामुळे होणारी कुचंबना टाळावी. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी दिलेला वसा आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाने व बाल विज्ञान विकास संस्थेच्या प्रेरणेतून शिक्षणा बरोबर आरोग्याचे महत्त्व व चांगल्या सवयी व आरोग्याचे उपक्रम याचे प्रात्यक्षिकाद्वारे सौ सविता देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
आपल्याला शिक्षणासाठी शासन वेगवेगळ्या माध्यमातून शिष्यवृत्ती अनुदान, प्रोत्साहनपर बक्षिसे देते. शिक्षणबा' विद्यार्थ्याला सुद्धा प्रवाहात आणणार असल्याचे असे बी. आर. चव्हाण यांनी सांगितले. शासकीय योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. वेगवेगळ्या वंचित घटकाच्या योजनाचा लाभ आपण घेऊ यासाठी सर्वाना शिक्षणाच्या गंगेत आणू आर. व्ही. निकम यांनी सांगितले.