प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थ्यांची; जागरण मात्र गुरुजींचे, रेंजची समस्या; ऑनलाइन सबमिशनचा गोंधळ कायम
By संकेत शुक्ला | Published: February 11, 2024 04:17 PM2024-02-11T16:17:39+5:302024-02-11T16:18:12+5:30
दिवसा वीजपुरवठ्यासह रेंजची अडचण असल्याने मध्यरात्रीनंतर मोबाईलला रेंज येताच ते काम करावे लागते आहे.
नाशिक : दहावी, बारावीच्या अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये केला जाणारा हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिकांचे गुण ओएमआर गुणपत्रिकांऐवजी ऑनलाइन भरण्याची केलेली सूचना अंमलात आणली जात असताना भागात अनेक ठिकाणी रेंजची समस्या येत आहे. दिवसा वीजपुरवठ्यासह रेंजची अडचण असल्याने मध्यरात्रीनंतर मोबाईलला रेंज येताच ते काम करावे लागते आहे.
शनिवारपासून म्हणजेच १० फेब्रुवारीपासून दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ झाला आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत या परीक्षा संपवायच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जाण्याचे प्रकार वारंवार घडतात. याची दखल घेऊन महामंडळाने ऑनलाइन गुणदानाचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन सबमिशनही त्वरित करण्याची सक्ती असून, ओएमआर शीट त्यानंतर मंडळाकडे दाखल करण्याची सूचना करण्यात आली आहे. ही प्रक्रियाही किचकट स्वरूपाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती त्यात भरताना रेंजची समस्या येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मंडळाने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे गुण शिक्षक, प्राचार्यांना संकेतस्थळावरील 'प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड लिंकमधून प्रचलित लॉगीन आयडी व पासवर्डचा वापर करून नोंदवावे लागणार आहेत. नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिले, अशा विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक 'आउट ऑफ टर्न' परीक्षेसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र ऑनलाइन गूणदान करण्यासाठी रेंजची अडचण येते. रात्री उशिरा रेंज मिळाल्यानंतर मार्क टाकावे लागतात. त्यानंतर शिट अपलोड होते. त्यामुळे गुरुजींना रात्रीचे जागरण सक्तीचे झाले आहे.
२० गुणांसाठी प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ झाला आहे. इंटरनल परीक्षा झाल्यानंतर ओएमआर शीट ऑनलाउन माहिती त्यात भरायची सूचना आहे. त्यानुसार कामकाज केले जात आहे. ही माहिती पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आणि ती ऑफलाइन पाठवायची आहे. त्यात काही तफावत आढळली, तर कारवाई होऊ शकते. ऑनलाइन सबमिशन वेळेत होत नसल्याने रेंज प्राप्त झाल्यानंतर ते भरावे लागतात. प्रसंगी रात्री उशिरा हे काम करावे लागते. त्यामुळे शासनाने यावर सकारात्मक विचार करावा.
- एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना.