सलग आठ वर्षे घरी न जाता केला आखाड्यात सराव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:19 AM2021-09-07T04:19:29+5:302021-09-07T04:19:29+5:30
नाशिक : रुस्तम ए हिंद बिराजदार मामा यांच्याकडे बालपणापासून सराव करताना मामांनी सांगितलेले वाक्य माझ्या मनावर कोरले गेले आहे. ...
नाशिक : रुस्तम ए हिंद बिराजदार मामा यांच्याकडे बालपणापासून सराव करताना मामांनी सांगितलेले वाक्य माझ्या मनावर कोरले गेले आहे. पहिलवानाने जर एक दिवस आखाडा चुकवला तर तो आठ दिवस मागे येतो, हे मामांचे वाक्य आजदेखील स्मरणात आहे. त्यामुळेच सलग आठ वर्षे घरापासून, सण-समारंभांपासून दूर राहून घरी न जाता मेहनत केल्याचे फळ भविष्यात मिळाले. तसेच आजदेखील केवळ कुस्तीचाच विचार करतो, असेही आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे यांनी प्रकट मुलाखतीत सांगितले.
महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व अर्जुन पुरस्कारार्थी राहुल आवारे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मुलाखतीवेळी बोलताना आवारे यांनी पुण्यामध्ये वयाच्या आठव्या वर्षी वडिलांनी गोकुळ वस्ताद तालमीमध्ये रुस्तम-ए-हिंद बिराजदार मामा यांच्याकडे आणल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे मेहनत करून घेतल्याचे सांगितले. कुस्तीचे डावपेच, कुस्तीतील बारीक बारीक गोष्टी सांगितल्या आणि मेहनत, कष्ट, खेळाप्रती आदर या सर्व गोष्टी त्यांच्याकडून शिकावयास मिळाल्या, असेही त्यांनी सांगितले. तसेच शालेय जीवनामध्ये मिळवलेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या सुवर्ण पदकाचे महत्त्व सांगताना शाळेतील क्रीडा शिक्षक यांनी कशा प्रकारे शालेय जीवनात प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी नमूद केले. पहिल्या राष्ट्रीय विजेतेपदाने मल्ल म्हणून कारकीर्द घडविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्यावर पुण्यातील पहिल्या स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक ते २०१९ पर्यंत मिळवलेल्या जागतिक स्पर्धेतील पदकापर्यंतचा प्रवास त्यांनी अतिशय प्रेरणादायक शब्दांमध्ये व्यक्त केला. त्याचबरोबर आई-वडिलांनी देखील कुस्ती क्षेत्रामध्ये वाटचाल करण्यासाठी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी क्रीडा वाटचालीविषयी माहिती दिली. यानंतर तालुका क्रीडा अधिकारी व राष्ट्रीय खेळाडू संदीप वांजळे यांनी मुलाखतीस सुरुवात केली. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आलेले होते. सूत्रसंचालन करून आभार क्रीडा संचालक डॉ. संतोष पवार यांनी मानले.
इन्फो
पॅरिसमध्ये ऑलिम्पिक पदकाचा विश्वास
हरियाणा, पंजाब ही उत्तरेकडील राज्यात ज्या प्रकारे कुस्ती व अन्य खेळांच्या खेळाडूंना कशा प्रकारे शालेय स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत क्रीडा मार्गदर्शन व सुविधा, आर्थिक पाठबळ, नोकरी इत्यादी सर्व गोष्टींमध्ये पूर्ण क्षमतेने मदत करतात, तसेच खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, या गोष्टी महाराष्ट्रत कमी प्रमाणात पाहावयास मिळतात, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच माझी सर्वोत्तम कामगिरी अजून बाकी असून २०२४ च्या पॅरिस ऑलम्पिकमध्ये नक्कीच भारताचा तिरंगा फडकवू, असा विश्वासदेखील आवारे यांनी व्यक्त केला.
फोटो
०५राहुल आवारे