प्रगटदिनी गोदेचा जयघोष
By Admin | Published: February 7, 2017 12:32 AM2017-02-07T00:32:00+5:302017-02-07T00:32:14+5:30
बुधवारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पंचवटी : गंगा गोदावरी माता की जय, जय जय गंगा मय्या असा जयघोष करत सोमवारी (दि. ६) गोदा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंचवटीतील गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघातर्फे माघ मास गोदा जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. माघ शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या गोदा जन्मोत्सवांतर्गत गोदावरी मातेची महापूजा आणि अभिषेक, रंगनाथशास्त्री गायधनी यांच्या उपस्थितीत गोदापुराण तसेच श्रीकृष्णबुवा सिन्नरकर महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रमांसह शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.६) गोदावरीचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी रामकुंड येथील श्री गंगा गोदावरी मंदिरात श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. तसेच दुपारी जन्मावेळी महाआरती व छप्पनभोग नैवेद्य अर्पण करण्यात आला. गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. रामकुंडावरील श्री गंगा गोदावरी मंदिरात सकाळी चतुर्वेद शांतिसुक्त, श्री गणेश आदि स्थापित देवता पूजन, प्रधान देवता, षोडशोपचार पूजन करण्यात आले. दुपारी प्रधान देवता हवन, अर्चन, स्थापित देवता पूजन करण्यात येऊन आरती, मंत्रपुष्पांजली व प्रार्थना करण्यात आली. जन्मोत्सवाच्या निमित्ताने भाविकांसाठी रक्तदान शिबिर, विश्वकल्याणार्थ पंचदिन साध्य, एकमुखात्मक शिवशक्ती महायज्ञाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. तसेच बुधवारी (दि. ८) शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन मंगल कार्यालयात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद दीक्षित यांनी दिली. जन्मोत्सव अंतर्गत घेण्यात येत असलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी (दि. ९) गंगा गोदावरी सत्संग सभामंडप येथे संध्याकाळी ६.३० वाजता करण्यात येणार आहे. बुधवार (दि.८)पर्यंत गोदा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून, भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. हा जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रमोद दीक्षित (अध्यक्ष), निखिल देव (उपाध्यक्ष), प्रमोद देव, कल्पेश दीक्षित, आकाश क्षेमकल्याणी, संतोष पंचभय्ये, शिवाजी देव, सतीश शुक्ल, शेखर शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)