भाजपाचे गुणगान, सेनेचे चहापान‘
By admin | Published: November 13, 2016 12:09 AM2016-11-13T00:09:23+5:302016-11-13T00:42:24+5:30
नोटा’रेटी : बॅँकांसमोर नागरिकांना मोफत सुविधा
नाशिक : चलनातून पाचशे-हजारच्या नोटा बाद ठरविण्याऱ्या मोदी सरकारच्या निर्णयाचे भाजपेयींकडून गुणगान आणि जल्लोष केला जात असताना दुसरीकडे शिवसेनेने शहरात ठिकठिकाणी बॅँकांसमोर रांगा लावून तासन्तास उभे राहिलेल्या नागरिकांसाठी मोफत चहापानाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकाही तैनात ठेवली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचा समाचार घेतल्यानंतर महानगर शिवसेनेने शनिवारी शहरात सुमारे ३५ ठिकाणी सेवाकेंद्र उभे करत भाजपाला एकप्रकारे खिजविण्याचाच प्रयत्न केला असल्याची चर्चा सुरू आहे.
नाशकात सेना-भाजपात एकमेकांविरुद्ध वेगवेगळ्या माध्यमातून चढाओढ सुरू असते. दोन्ही पक्ष एकमेकांना पाण्यात पाहण्याची संधी शोधत असतात. फक्त निमित्ताचा अवकाश असतो. गेल्या मंगळवारी (दि. ८) रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद ठरविल्यानंतर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. बाद ठरलेल्या पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शहरातील सर्व बॅँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत. बॅँकेच्या नियोजित वेळेआधी पहाटेपासूनच नागरिक बॅँकांसमोर रांगा लावून प्रतीक्षा करताना दिसून येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. तासन्तास उन्हातान्हात उभे राहिल्याने काहींना भोवळ आल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. एकीकडे नागरिक बॅँकांसमोर रांगा लावून नोटा बदलण्याच्या चिंतेत असताना मोदी सरकारच्या निर्णयाचे भाजपा कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी स्वागत व जल्लोषही केला जात आहे. मोदी सरकारने काळा पैसा कसा बाहेर काढला याबाबतचे गुणगानही ऐकविले जात आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. ११) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सतावणाऱ्या या निर्णयाचा समाचार घेतल्यानंतर आणि राज्यात दोन ठिकाणी बॅँकांसमोर रांगेत उभे असलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना लक्षात घेऊन शिवसेनेने शनिवारपासून शहरातील प्रमुख बॅँकांसमोर ‘सेवाकेंद्र’ उभे करत रांगेत उभे असलेल्या नागरिकांच्या मोफत चहापानाची सोय केली आहे. सोबतच बिस्किट आणि चॉकलेटचीही व्यवस्था करण्यात आली आहे.